मुंबई – कोविड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना आज अखेर अटक केली आहे. जंबो कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याआधी मनी लॉंड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने त्यांना अटक केली होती. दरम्यान, न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
संजय राऊतांच्या मित्र परिवाराने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचं कंत्राट मिळवले, असा आरोप त्यांनी केला होता.
यापूर्वी ईडीने सुजित पाटकर आणि डॉ. किशोर बिसुरे यांना अटक केली होती. किशोर बिसुरे हे बीएमसीचे डॉक्टर आहेत, तसेच दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचे डीन होते. दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचा करार सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंटशी करण्यात आला होता, अशी माहिती आहे.