मुंबई – राज्य सरकारची अनलॉकसंबंधीची नवी नियमावली आज जारी करण्यात आली आहे. 25 जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये राज्यात वीकेंड लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्यात आला आहे. परंतु पुण्यासह 11 जिल्ह्यांमध्ये लेवल 3 चे नियम कायम ठेवण्यात आले आहेत. ही नवी नियमावली बुधवार, दि. 4 ऑगस्टपासून लागू होणार आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यात सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहणार आहेत. मात्र 11 जिल्यातील निर्बंध कायम ठेवण्यात आले. यात पुणे शहर आणि जिल्याचा समावेश आहे.
पुणे शहर आणि जिल्यातील निर्बंध कायम ठेवण्यात मुद्यावरून आज माध्यमांशी बोलतांना विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘काही निर्बंध कडक करावे लागतात. मागच्या लाटेत पुणे, ठाणे, नागपूर आणि मुंबई हे हॉटस्पॉट होते. पुण्याची परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी बराच काळ लागला होता. पुण्यात कोरोनाचा स्प्रेड व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे पुणेकरांना काही काळ थोडीशी कळ सोचावी लागेल. त्यांनाही शिथिलता देऊ.’ असं वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, राज्यातील अधिक रुग्ण संख्या असलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये लेवल 3 चे नियम कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, बीड, अहमदनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम राहणार आहेत. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात स्थानिक प्रशासन यावर निर्णय घेणार आहे.
या नियमावलीनुसार जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे रात्री आठवाजेपर्यंत सुरू असणार आहे. मात्र यासाठी 50 टक्के क्षमतेची मर्यादा घालण्यात आली आहे. शिवाय,वातानुकुलित यंत्रणा वापरायला मात्र बंदी असणार आहे. तर, धार्मिकस्थळे उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नसून, राज्यभरात धार्मिकस्थळे ही बंदच असणार आहे.
सरकारी आणि खासगी कार्यालयांना पूर्ण क्षमतेने चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. याचबरोबर, जी कार्यालये वर्क फ्रॉम होम बेसिसवर चालत होती किंवा चालू शकतात ती तशीच चालू ठेवावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.