लीमा –आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय नेमबाजांनी आपला दबदबा कायम राखला आहे. भारतीय महिला संघाने स्कीटमध्ये सुवर्ण, तर पुरुष संघाने कांस्य पदकावर नाव कोरले.
भारताच्या अरीबा खान, रेजा ढिल्लो आणि गनीमत शेखों या तिकडीने 6-0 असा स्कोर करत स्कीट स्पर्धेत पहिले स्थान पटकावले. सुवर्णपदकाच्या फेरीत शुक्रवारी भारतीय महिला संघाचा सामना इटली संघाशी झाला होता.
पुरुष गटात राजवीर गिल, आयुष रुद्रराजू आणि अभय सिंह शेखो यांनी तुर्कीच्या अली केन अब्रासी, अहमत बारान आणि मुहम्मत सेहुन यांना 6-0 अशा गुण फरकाने पराभूत करत कांस्यपदक जिंकले. दरम्यान, एक दिवस अगोदर भारतीय नेमबाज गनीमतने व्यक्तिगत स्कीट स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.
दुसरीकडे पुरुष गटात भारताच्या तिन्ही नेमबाजांची कामगिरी निराशाजनक राहिली; परंतु तिघांनी सांघिक स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करत कांस्यपदक जिंकले. ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये आतापर्यंत 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह एकूण 7 पदके जिंकत भारत दुसऱ्या स्थानावर आले. तर अमेरिका 3 सुवर्णांसह 7 पदके जिंकत पहिल्या क्रमांकावर आहे.