बीड – काही दिवसांपूर्वीच पुणे महानगर पालिकेच्या महिला अधिकाऱ्याला भाजप आमदाराने शिवीगाळ केल्याची ऑडियो क्लिप समोर आली होती. त्यामुळे एकच गदारोळ झाला होता. आता भाजपच्या महिला आमदारांच्या पतीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार घडला. रस्त्याच्या कामावरून दोन महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला होता. मात्र याची ऑडिओ क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
अक्षय मुंदडा यांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी ऋषिकेश अण्णासाहेब लोमटे रा. अंबाजोगाई यांचा फोन आला. त्यांनी फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी संभाषण रेकॉर्ड करून घेतले.
दरम्यान देवस्थानच्या रस्त्याच्या कामावरून हा वाद चव्हाट्यावर आला आहे. आधी ऋषिकेश लोमटे यांनी कॉलवरून विनंती करत रस्त्याचे काम सुरू करू देण्याची मागणी केली. मात्र विनंती करूनही आमदार पतीने न ऐकल्यामुळे ऋषिकेश लोमटे यांना राग अनावर झाला आणि त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. आता या ऑडिओ क्लिप वरून विकास कामांमध्ये खोडा घालण्याचे काम कोण करतय याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.