चंद्रपूर – चंद्रपुरात कोसळलेल्या सॅटेलाईटची दखल ‘इस्रो’ने घेतली आहे. सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी आणि परिसरात अवकाशातून सॅटेलाईटचे काही भाग पडले होते.
2 एप्रिलला राज्यभरातून आकाशात आगीचे लोळ पृथ्वीकडे झेपावत असल्याची दृश्ये लाखो लोकांनी अनुभवली आणि कॅमेराबध्द केली. लाडबोरी येथे गावात एका मोकळ्या भूखंडावर पडली होती. चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी इस्रोला याबाबत ई मेल द्वारे माहिती दिली होती.
आपल्या फेसबुक पेजवरून इस्रोने तीन दिवसांनी पोस्ट करून घटनेची दखल घेतल्याचे जाहीर केले आहे. इस्रोच्या तज्ज्ञ वैज्ञानिकांचे एक पथक या वस्तू अभ्यासण्यासाठी लाडबोरी आणि परीसरात भेट देणार आहेत.
सॅटेलाईटचे हे भाग चंद्रपूर जिल्ह्यातील लाडबोरी आणि पवनपार तर वर्धा जिल्ह्यातील वाघेडा आणि धामणगाव परिसरात कोसळले. 10 फूट व्यासाची मिश्र धातूची रिंग, धातूचे पाच बलून 5 अन्य ठिकाणी सापडले होते. सॅटेलाईटचे हे भाग सध्या प्रशासनाच्या ताब्यात आहेत. सोबतच सॅटेलाईटचे अन्य भाग गोळा करण्यासाठी प्रशासनाने विशेष टीम गठीत केल्या आहेत.