तेल अविव, (इस्रायल) – हमास विरुद्धचे युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायली फौजांनी गाझा पट्ट्यातील तब्बल 130 भुयारे उद्ध्वस्त केली आहेत, अशी माहिती इस्रायली सैन्य दलाच्यावतीने देण्यात आली आहे.
सोशल मीड्यावरील पोस्टमध्ये “आयडीएफ’ने ही माहिती दिली आहे. “आयडीएफ’चे लष्करी इंजिनिअर सध्या गाझामधील भुयारे शोधून काढून नष्ट करण्याच्या उपाययोजना शोधून काढत आहेत. यामध्ये भूमिगत भुयारे, लांब अंतराचे बोगदे आणि बंकरचाही समावेश आहे, असेही “आयडीएफ’ने म्हटले आहे.
जी भुयारे शोधून काढली गेली आहेत, तेथे पाणी आणि ऑक्सिजन असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरून तेथे हमासचे दहशतवादी दीर्घ काळापासून वास्तव्य करत असल्याचा निष्कर्ष निघतो. यापैकी 130 भुयारांची तोंडे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.
या भुयारांमद्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांना संपवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार केला जातो आहे. या भुयारांमध्ये विषारी वायू पसरवण्याच्या पर्यायाचाही विचार केला गेला होता. मात्र अशा विषारी वायूचा वापर आंतरराष्ट्रीय कायद्याला अनुसरून नाही. त्या ऐवजी भुयारांमध्ये समुद्राचे पाणी भरण्याचा पर्यायही विचाराधीन आहे.
इस्रायलच्या लष्करी कारवाईमध्ये आतापर्यंत 3 हजार दहशतवाद्यांचा खात्मा केला गेल्याचा दावा केला जातो आहे. या दहशतवाद्यांकडून जी घातक शस्त्रे वापरली जात होती ती आता इस्रायलच्या सैन्याने जप्त केली असून या शस्त्रांचा एक व्हिडीओ “आयडीएफ’ने प्रसिद्ध केला आहे.
हमासची भुयारे 200 मीटर खोलीवर
भूमिगत भुयारे उद्ध्वस्त करण्यासाठी इस्रायलकडून भूसुरुंगांचा वापर करण्याचा पहिल्यांदा विचार झाला. मात्र हे भूसुरुंग 60 ते 70 मीटर खोलीपर्यंतच स्फोट घडवून आणू शकतात. हमासने इराणच्या मदतीने कॉंक्रिटच्या सहाय्याने तब्बल 150 ते 200 मीटर खोलीवर हे बंकर आणि भुयारे बांधली आहेत. ते उद्ध्वस्त करण्यासाठी इस्रायलला वेगळ्या उपाययोजनांचा वापर करावा लागणार आहे.