जेनिन (वेस्ट बँक) – वेस्ट बँकमधील एका रुग्णालयावर इस्रायलच्या वेषांतर केलेल्या सैनिकांनी आज हल्ला केला आणि रुग्णालयात लपून बसलेल्या ३ पॅलेस्टिनी दहशतवाद्यांचा खात्मा केला. इस्रायलचे हे सैनिक महिला आणि वैद्यकीय कर्मचार् यांच्या वेशामध्ये या रुग्णालयामध्ये घुसले होते. या नाट्यमय कारवाईमुळे दक्षिण गाझामध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचे लोण वेस्ट बँकपर्यंत पोचल्याचे स्पष्ट झाले.
इस्रायलच्या सैनिकांनी वेस्ट बँकमधील जेनिन शहरातल्या सीना रुग्णालयात घुसून कारवाई केली. कारवाईच्यावेळी उलट गोळीबार झाला नाही. त्यामुळे ही कारवाई म्हणजे ठरवून केलेली हत्या असल्याचे सिद्ध होते, असे पॅलेस्टाइनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
तर हे दहशतवादी रुग्णालयात लपून बसले होते, असे इस्रायलच्या लष्करी अधिकार् यांनी म्हटले आहे. या दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी शस्त्रे आणि दारुगोळा नियोजित ठिकाणी हलवला असल्याचा दावाही लष्कराने केला आहे. मात्र आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही.
दरम्यान गाझामध्ये युद्धविराम लागू करण्यासाठी हमासने घातलेल्या दोन्ही अटी इस्रायलने फेटाळून लावल्या आहेत. गाझामधून सैन्य मागे घेण्यास आणि तुरुंगात असलेल्या हजारो दहशतवाद्यांची सुटका करण्यास इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट नकार दिला आहे.