बैरुत – सीरियाची राजधानी दमास्कसवर इस्रायलने शनिवारी रात्री केलेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये किमान 15 जण ठार झाले आहेत. सुरक्षा रक्षकांच्या रहिवासी इमारतीवर केलेल्या या हल्ल्यामध्ये इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे, असे युद्ध निरीक्षक गटाने म्हटले आहे. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यामध्ये ठार झालेल्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे, असे ‘सिरीयन ऑब्जर्वेटरी फॉर ह्युमन राईटस” संघटनेचे प्रमुख रामी अब्देल राहमन यांनी म्हटले आहे.
काफर स्कवेअर जिल्ह्यातील 10 मजली इमारतीवर इस्रायलने हा रॉकेट हल्ला केला होता. याशिवाय माझरा जिल्ह्यात एक महिलाही ठार झाली. इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणाऱ्या सीरियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या माऱ्यात ही महिला ठार झाली असावी, असा अंदाज ब्रिटनस्थित निरीक्षक गटाने म्हटले आहे. इस्रायलने हा हल्ला नक्की कोणाला लक्ष्य करण्याच्या हेतूने केला असावा, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. इस्रायलची काही क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा सीरियाच्या संरक्षण दलांच्यावतीने करण्यात आला आहे.
सीरियातील राजवटीच्या समर्थनातील इराणी गट आणि हिजबुल्लाह संघटनेच्या काही ठिकाणांवरही क्षेपणास्त्रांचा मारा केला गेला आहे. या हल्ल्याच्या वृत्ताला इइस्रायलच्यावतीने दुजोरा देण्यात आला आहे. मात्र या हल्ल्यामागील हेतूबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सीरियाच्याविरोधात इस्रायलचा दशकभरापासूनचा संघर्ष सुरू आहे. सीरियामधून इराणी गट इस्रायलमधील कारवाया करत असल्याचा आरोप इस्रायलच्यावतीने करण्यात येतो आहे.