नवी दिल्ली – हमासविरोधात इस्रायलने (Israel ) युद्धबंदी जाहीर करावी, यासाठी अमेरिकेने आणलेला दबाव इस्रायलने जुमानला नाही. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान मानवतावादी मदत अधिक प्रमाणात गाझामध्ये पाठवता यावी,यासाठी युद्धबंदी (Israel war) जाहीर करावी, असे अमेरिकेने इस्रायलला सुचवले होते. हमासच्या तावडीत असलेल्या अंदाजे 240 इस्रायली नागरिकांच्या सुटकेपर्यंत ही युद्धबंदी कायम ठेवावी, असेही अमेरिकेने (America) म्हटले होते. मात्र इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेची ही सूचना नाकारली आहे.
इस्रायल आणि हमासमधील (Hamas) युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ऍन्टनी ब्लिंकेन तिसऱ्यांदा इस्रायलच्या दौऱ्यावर गेले आहेत. तेथे त्यांनी हमासला संपवण्यासाठी इस्रायलला असलेल्या अमेरिकेच्या पाठिंब्याचा पुनरुच्चारही केला. याच भेटीदरम्यान मानवतावादी सहकार्यासाठी युद्ध काही काळासाठी थांबवण्याचे अद्यक्ष बायडेन यांचे आवाहन देखील इस्रायलच्या नेत्यांसमोर मांडले. (Israel hamas)
इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे गाझामधील (gaza) पॅलेस्टिनींच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यातच मदत आणि बचाव सामुग्री पुरेशा प्रमाणात गाझामध्ये पोचत नसल्यामुळे तेथील जनतेचे मोठे हाल सुरू आहेत. गाझातील 70 टक्के जनतेने दक्षिणेकडे पलायन केले आहे, असे संयुक्त राष्ट्राने शुक्रवारी म्हटले होते.
पॅलेस्टिनी नागरिकांपर्यंत किमान आवश्यक मदत पोचवण्यासाठी युद्ध काही काळ स्थगित करणे आवश्यक असल्याचे ब्लिंकेन यांनी नेतान्याहू यांना सांगितले. मात्र नेतान्याहू यांनी युद्ध कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, असे ठामपणे सांगितले आहे. अमेरिकेला संपूर्ण युद्धबंदी नको आहे, केवळ मानवतावादी मदतीसाठी युद्ध तात्पुरते स्थगित केले जायला हवे आहे. मात्र तरी देखील नेतान्याहू यांनी युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबवले अथवा स्थगित केले जाणार नाही, असे ठामपणे म्हटले आहे.