पुणे – गोडाऊनच्या भाड्याच्या कारणातून झालेल्या वादात पाच ते सहा जणांनी मिळून लोखंडी रॉडने मारहाण करत गोडाऊन मालकाचा खून केला. त्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने संबंधीत व्यक्तीच्या अपघाताचा बनाव रचला. मात्र लोणीकंद पोलिसांनी खूनाच्या गुन्ह्याचा छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
बाजीराव सुदाम खांदवे (वय.55,रा. हरणतळे वस्ती, लोहगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी, पोलिसांनी लक्ष्मण नारायण इमनेलु (वय.38,रा.पाटोदा खुर्द,ता.धर्माबाद नांदेड) याला अटक केली असून, मुख्यसुत्रधार नागेश नाईक आणि त्याचे इतर साथीदार फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खांदवे यांचे पठारे वस्ती लोहगा येथे गोडाऊन आहे. ते नागेश नाईक याला भाड्याने दिले आहे. भाड्याच्या कारणातून नागेश आणि खांदवे यांचा वाद झाला होता. खांदवे यांना नागेश याने गोडाऊन बोलावून घेतले. तेथे त्याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी लोखंडी रॉडने मारहाण करून खून केला. पुढे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी रिक्षामध्ये खांदवे यांचे प्रेत टाकून वाघोली परिसरातील एका बंद पडलेल्या खदानीत टाकून दिले होते. कोणाला खूनाचा सुगावा लागू नये म्हणून आरोपींनी खांदवे यांचा अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचला होता.