इस्लामपूर (विनोद मोहिते) – येत्या सहा महिन्यांत असणारी इस्लामपूर नगरपरिषदेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली जावी या मागणीसाठी महाडीक गटाच्या आजी-माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना निवेदन देत साकडे घातले.
आज शनिवारी महाडिक शैक्षणिक संकुलात चंद्रकांत पाटील, माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे कार्यक्रम झाले. यावेळी चंद्रकांत पाटील यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी राहुल महाडिक, सम्राट महाडिक उपस्थित होते.
गेली ३५ ते ४० वर्षे इस्लामपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आघाडी करून निवडणूक लढवली जात आहे. यापूर्वी यातील १० वर्ष विरोधी पक्षामध्ये भाजप – शिवसेना विकास आघाडी यांची संयुक्त सत्ता आली आहे . यात भाजप कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे. परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा लाभ कधीही झालेला नाही.
येणारी नगरपालिकेची निवडणूक आपल्या व राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या ‘कमळ’ चिन्हावर लढवली जावी अशी अपेक्षा नगरसेवक अमित ओसवाल, चेतन शिंदे, अन्नपूर्णा फल्ले या विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवक कपिल ओसवाल, सतीश व सुनीता महाडिक, महाडिक युवाशक्तीचे कार्यकर्ते जलाल मुल्ला यांनी व्यक्त केली आहे. हे सर्व आजी माजी नगरसेवक राहुल व सम्राट महाडिक यांचे समर्थक आहेत.