1 ऑगस्टपासून अंमलबजावणी होणार
पुणे – देशांतर्गत दर्जाहीन प्रेशर कुकर तयार होऊ नये किंवा अनावश्यक आयात होऊ नये याकरिता कुकरच्या दर्जाबाबत मार्गदर्शक सूचना औद्योगिक प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाने जारी केल्या आहेत. अनेकदा अनौपचारिक क्षेत्रातून कुकरची निर्मिती होते, अशा प्रकारच्या प्रेशर कुकरमुळे धोका संभवतो. अन्न नीट शिजले जात नाही त्याचबरोबर ऊर्जेची हानी होते. याकरिता या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात गरजेचे होते, असे विभागाने म्हंटले आहे.
विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार देशांतर्गत प्रेशर कुकरवर ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डकडून (बिआयएस) उत्पादनाचा परवाना असणे आणि प्रेशर कुकरवर तसा मार्क असणे गरजेचे आहे. प्रेशर कुकर आयएसआय मार्कशिवाय उत्पादन, विक्री, आयात किंवा साठवणूक केली जाऊ शकणार नाहीत.
1 ऑगस्ट पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तोपर्यंत सर्व संबंधितांना यासंदर्भात तयारी करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. याकरिता नियंत्रणाचे, परवान्याचे अधिकार बीआयएसकडे देण्यात आले आहेत. मात्र, हा नियम निर्यात केल्या जाणाऱ्या प्रेशर कुकरना लागू होणार नाही, त्याच्यासाठी वेगळे मानदंड अगोदरपासूनच कार्यरत आहेत. देशातील दैनंदिन उपयोगाच्या 350 वस्तूंच्या दर्जा नियंत्रणाकडे सरकार लक्ष देणार आहे.