पुणे – शहरातील वाढती वाहतुकीची समस्या लक्षात घेता कोथरूड आणि चतु:शृंगी वाहतूक विभागांतर्गत वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहेत. वाहतूक सुरळीत सुरक्षित व्हावी, या उद्देशाने हे बदल होणार आहेत. वाहतूक शाखेचे अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
कोथरूड वाहतूक विभागांतर्गत पौड रस्त्यावरील लोहिया जैन आयटी पार्क ते रॉयल इन्फील्ड शोरुम या दरम्यान नो-पार्किंग करण्यात येणार आहे. याबाबत सूचना असल्यास नागरिकांनी येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात 8 फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरूपात जमा करायच्या आहेत.
चतु:शृंगी विभागांतर्गत गणेशखिंड रोडवर सूर्यमुखी चौकात सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 6 ते 9 या वेळात ई स्क्वेअर ते हरेकृष्ण पथ येथून उजवीकडे वळण्यास बंदी करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सूचनांचा विचार करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे.