लोणी काळभोर -कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत हद्दीत गुरुवारी (दि.21) एकाच दिवसात दोन करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. लोणी स्टेशन व परिसरातील कंटेन्मेंट झोन उठवून चोवीस तासांच्या आतच दोन रुग्ण आढळल्याने अठ्ठावीस दिवसांसाठी कंटेन्मेंट झोन लागू होणार याची भीती निर्माण झाली आहे. कदमवाकवस्तीत सापडलेल्या दोन बाधित रुग्णांपैकी एक 62 वर्षीय रुग्ण एक दिवसापासून पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत आहे. तर दुसरा 70 वर्षीय रुग्ण हा हडपसर परिसरातील वैदुवाडी येथून लोणी स्टेशन (कदमवाकवस्ती) येथील खासगी रुग्णालयात दोन दिवसांपासून उपचार घेत आहे. दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील नातेवाइकांची माहिती घेण्याचे काम आरोग्य विभागाने सुरू केले आहे. जिल्हा परिषदेच्या लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी डी. जे. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती हद्दीतील पठारे वस्ती परिसरात राहणारी 62 वर्षीय व्यक्ती ही चार दिवसांपासून आजारी आहे. संबंधित व्यक्तीला दोन मुले आहेत. वडील आजारी असल्याने दोन्ही मुलांनी संबंधित व्यक्तीला बुधवारी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. संबंधित व्यक्तीची कोरोना टेस्ट केली असता हा रुग्ण बाधित आढळला आहे. बाधित व्यक्तीच्या दोन्ही मुलांच्या करोना टेस्ट ससून रुग्णालयात केल्या आहेत. त्यांच्या घरातील आणखी तीन महिलांना चाचणीसाठी तात्काळ पुण्यात हलविले आहे. दुसऱ्या घटनेतील 70 वर्षीय रुग्ण हा हडपसर परिसरातील वैदुवाडीतून उपचारासाठी कदमवाकवस्ती येथील खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. रुग्ण दाखल होताच संबंधित रुग्णांची केलेली करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याबाबतची माहिती लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिली असल्याचे खासगी रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. करोनामुक्त पूर्व हवेलीला “ब्रेक’ कदमवाकवस्ती, उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीत मागील महिनाभराच्या काळात नऊ करोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. उर्वरित सहा करोनाबाधीत रुग्णांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने घरी पोहोचले होते. सातवा व शेवटचा कुंजीरवाडी येथील रुग्ण आजच घरी आला होता. त्यामुळे करोनामुक्त पूर्व हवेलीला “ब्रेक’ मिळाला आहे.