मुंबई – बीसीसीआयने पुढील वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत दोन संघ वाढवण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केले होते. आता या संघांच्या लिलावासाठी मुदतवाढ करण्यात आली असून इच्छूक संस्थांना येत्या बुधवारपर्यंत निविदा घेता येणार आहेत. तसेच बीसीसीआयने खेळाडू खरेदीसाठी प्रत्येक संघाकडे असलेल्या सॅलरीपर्समध्येही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
या स्पर्धेसाठीची निविदा प्रक्रिया व कागदपत्रे मिळण्यासाठी 31 ऑगस्ट ही तारीख निश्चित केली होती. या संघांच्या लिलावासाठी 25 ऑक्टोबरला बोली लागणार असून बीसीसीआयने आईटीटी कागदपत्रे विकत घेण्यासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत वेळ वाढवून देण्यात आली असून याची किंमत 10 लाख रुपये असणार आहे. ही किंमत एकदा भरल्यानंतर ती थेट बीसीसीआयच्या तिजोरीत जाणार असून ती परत दिली जाणार नाही.
सध्या आयपीएलमध्ये असणारे संघ मोठ्या कंपन्यांच्या मालकिचे आहेत. त्याप्रमाणेच नव्या येणाऱ्या दोन संघासाठी देखील देशातील अनेक कॉर्पोरेट कंपन्यानी तयारी सुरु केली आहे. कोलकाता स्थित आरपी-संजीव गोयंका, अहमदाबाद स्थित अदानी ग्रुप, हैद्राबाद स्थित अरबिंदो फार्मा लिमिटेड आणि टॉरंट ग्रुप या कंपन्या संघ घेण्यासाठी इच्छुक आहेत. संजीव गोयंका ग्रुपचा पुणे सुपरजाएंट हा संघ याआधी 2016 आणि 2017 सालच्या मोसमात सहभागी झाला होता. बीसीसीआय या वर्षाच्या अखेरीस मोठा लिलाव आयोजित करण्याची शक्यता आहे. तसेच मीडिया राइट्सबाबतचा मोठा लिलावही यावेळी होणार आहे.
बीसीसीआयने नव्या नियमांत संघाची सॅलरी पर्समधील रक्कम ही वाढवली आहे. त्यामुळे संघाकडे खेळाडू विकत घेण्यासाठी 85 कोटी नाहीतर 90 कोटी रुपये उपलब्ध होतील. त्यामुळे 10 संघाचा विचार करता एकूण 50 कोटींची वाढ करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षात ही रक्कम 90 वरुन 95 कोटी होऊ शकते, 2024 सालापर्यंत ही रक्कम 100 कोटी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.