पुणे – मधल्या फळीतील फलंदाज रियान पराग याने फटकावलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे राजस्थान रॉयल्सला आयपीएल स्पर्धेत मंगळवारी झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर बेंगळुरूसमोर विजयासाठी 145 धावांचे समाधानकारक लक्ष्य ठेवता आले. कर्णधार संजू सॅमसनसह प्रमुख फलंदाजांना मोठी खेळी करण्यात आलेल्या अपयशानंतर परागने आक्रमक फलंदाजी करत संघाला आश्वासक धावसंख्या उभारून दिली.
या सामन्यात नाणेफेक जिंकत बेंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसीने राजस्थानला पहिल्यांदा फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय सार्थ ठरवताना बेंगळुरूच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच राजस्थानच्या फलंदाजांवर दडपण राखले. सलामीवीर देवदत्त पडिक्कल लवकर बाद झाल्यावर रवीचंद्रन अश्विनला पिंचहिटर म्हणून फलंदाजीला पाठवले गेले. त्याने 4 चौकार फटकावत आपला इरादा स्पष्ट केला. मात्र, तो वेगाने धावा जमवण्याच्या प्रयत्नात लगेचच बाद झाला. यंदाच्या स्पर्धेत तीन शतके फटकावलेला जोस बटलर या सामन्यात मात्र साफ अपयशी ठरला व त्यामुळेच राजस्थानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
कर्णधार संजू सॅमसनने षटकारांची आतषबाजी केली. मात्र, तो वनिंदू हसरंगाचा गुगली ओळखू शकला नाही व त्याचा 27 धावांवर त्रिफळा उडाला. डॅरेल मिचेलही अपयशी ठरला, त्याला केवळ 16 धावाच करता आल्या. त्यानंतर मात्र परागने जबाबदारीने खेळ केला. आयपीएल स्पर्धेत पदार्पणापासून फारशी चमक दाखवू न शकलेल्या परागने या सामन्यात मात्र नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली.
Innings Break!
Brilliant bowling effort from @RCBTweets restricts #RR to a total of 144/8 on the board.
Scorecard – https://t.co/fVgVgn1vUG #RCBvRR #TATAIPL pic.twitter.com/gCq3webZZw
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2022
त्याने आपल्या नाबाद 56 धावांच्या खेळीत 31 चेंडूंचा सामना केला व त्यात 3 चौकार व 4 षटकार फटकावले. बेंगळुरूच्या गोलंदाजांनी अखेरच्या पाच षटकांत धावांवर नियंत्रण राखले व तळातील फलंदाजांना जास्त काळ टिकू दिले नाही. बेंगळुरूकडून महंमद सिराज, वनिंदू हसरंगा व जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. हर्षल पटेलने 1 बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक – राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 8 बाद 144 धावा. (संजू सॅमसन 27, रवीचंद्रन अश्विन 17, डॅरेल मिचेल 16, रियान पराग नाबाद 56, जोश हेझलवूड 2-19, वनिंदू हसरंगा 2-23, महंमद सिराज 2-30, हर्षल पटेल 1-33).