मुंबई – रवींद्र जडेजाकडून पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व हाती घेतल्यावर महेंद्रसिंह धोनीने आगामी मोसमात संघ चमकदार कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला. तसेच स्पर्धेच्या मध्यावर नेतृत्वात बदल केल्याने तसा काही विशेष फरक पडत नाही, असे मतही धोनीने व्यक्त केले.
आयपीएल स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या मोसमात तुम्ही मला पिवळ्या जर्सीत निश्चितच पाहाल. मात्र, ही जर्सी कोणती असेल, हे येणारा काळच सांगेल. संघात एक कर्णधार व खेळाडू किंवा अन्य कोणत्या तरी भूमीकेत मी दिसेन, असेही धोनीने सांगितले.
मी इथे काही वेगळे केले नाही. जेव्हा तुम्ही एकाच ड्रेसिंग रूममध्ये असता तेव्हा तुम्ही त्याच गोष्टी बोलत असता. त्यामुळे कर्णधार बदलल्याने फारसा बदल होत नाही. सांघिक कामगिरीनेच संघ विजयाच्या मार्गावर वाटचाल करतो. संघाचे नेतृत्व कोणाकडे आहे त्याने फारसा फरक पडत नाही. जडेजाला गेल्या मोसमातच माहित होते की तो यावर्षी कर्णधार होणार आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये मी त्याचे कर्णधारपद पाहिले आणि नंतर त्याला त्याच्या मर्जीने जबाबदारी पार पाडू दिली. मला वाटते की कर्णधारपदाचा त्याच्या तयारीवर आणि खेळावर परिणाम होत होता. त्याचा परिणाम त्याच्या फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावरही दिसून आला, असे धोनी म्हणाला.
धोनीने यंदाच्या मोसमाला प्रारंभ होण्यापूर्वी चेन्नई संघाचे नेतृत्व सोडले होते व जडेजाकडे ही जबाबदारी दिली होती. संघाला सातत्याने पराभवांचा सामना करावा लागल्यामुळे पुन्हा एकदा जडेजाकडून ही सुत्रे धोनीने आपल्या हाती घेतली. नेतृत्वातील पहिल्याच सामन्यात चेन्नईने विजय मिळवला व त्यावरुनच जडेजाकडे नेतृत्व का सोपवण्यात आले असा सवाल निर्माण झाला त्यावर धोनीने आपली मते मांडली.