#IPL2021 : आता आयपीएलही रद्द करणार का? – वॉन

लंडन – अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतील बुधवारच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्याच्यासह एकूण सहा व्यक्‍तींना विलगीकरणात पाठवले गेले आहे. याचा संदर्भ घेत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने बीसीसीआयला खोचक सवाल केला आहे. करोनाच्याच भीतीमुळे बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धची मॅंचेस्टर येथे होणारी पाचवी कसोटी रद्द केली होती. त्याच पार्श्‍वभूमीवर आयपीएलही रद्द करणार का, अशी विचारणा वॉनने केली आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील अन्य दोन व्यक्‍तींना करोनाची बाधा झाल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील मॅंचेस्टर येथील पाचवा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. त्यामुळे इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळ तसेच त्यांचे आजी माजी खेळाडूही सातत्याने बीसीसीआयवर टीका करत आहेत.

आता आयपीएल स्पर्धेतही नटराजनला करोनाची बाधा झाल्यामुळे त्यांना बीसीसीआयवर आणखी कठोर शब्दांत टीका करण्याची संधी मिळाली आहे. आता आयपीएलमध्येही करोनाची एन्ट्री झाल्याचे समोर आल्यामुळे ही स्पर्धाही रद्द करणार का, असा खोचक सवाल वॉनने केला आहे.

करोनाची बाधा झालेला टी. नटराजनच नव्हे, तर त्याच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना विलगीकरणात पाठवण्यात आले आहे. त्यात विजय शंकर, संघ व्यवस्थापक विजय कुमार, फिजिओथेरपिस्ट श्‍याम सुंदर, डॉक्‍टर अंजना वनान, सहायक व्यवस्थापक तुषार खेडकर आणि नेट गोलंदाज पेरियासमय यांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.