#IPL2021 : कोलकातासमोर बंगळुरूचे कडवे आव्हान

अहमदाबाद  -यंदाच्या मोसमात दमदार सुरुवात केल्यानंतर दोन सामन्यांत पराभव झालेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पुन्हा एकदा विजयी पथावर येण्यास सज्ज झाला आहे. त्यांचा सामना सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंत आणि शिमरॉन हेटमायर या जोडीला वेगवान गोलंदाज महंमद सिराजने शेवटच्या षटकात 14 धावा करण्यापासून रोखले नसते, तर बंगळुरूला सलग तीन पराभवांना सामोरे जावे लागले असते. कोलकाताविरोधात बंगळुरूला विजय मिळवायचा असल्यास विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लॅन मॅक्‍सवेल यांच्या कामगिरीकडे संघाचे लक्ष असणार आहे. तसेच सलामीवीर देवदत्त पडिक्‍कलदेखील मोठी खेळी करण्यासाठी उत्सुक असणार आहे. कारण राजस्थानविरोधात केलेल्या नाबाद 101 धावांनंतर तो प्रभावी कामगिरी करू शकलेला नाही.

दुसरीकडे इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वात विजयी सलामी देणाऱ्या कोलकाता संघाला अपेक्षेनुसार कामगिरी करण्यात अपयश आले आहे. कोलकाताला सात सामन्यांत पाच वेळा पराभव स्वीकारावा लागला आहे. स्पर्धेत ते सहाव्या स्थानी असून, सलग तिसऱ्या सत्रात त्यांच्यासमोर पहिल्या फेरीत बाहेर पडण्याचे संकट उभारले आहे. त्यांच्या आघाडीच्या फलंदाजांनी खूपच निराशाजनक कामगिरी केली आहे. शुभमन गिल, नितीश राणा आणि राहुल त्रिपाठी हे संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकलेले नाहीत.

शुभमन गिलला धावांसाठी संघर्ष करावा लागत असून, चांगल्या सुरुवातीनंतर तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत आहे. तसेच राणा आणि त्रिपाठी यांना कामगिरीत सातत्य ठेवता आलेले नाही. गतवर्षी यूएईत झालेल्या आयपीएल स्पर्धेत दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात संघाने चांगले प्रदर्शन करत चार विजय मिळविले होते. परंतु यानंतरही त्याने कर्णधारपद सोडत इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनकडे संघाची जबाबदारी सोपविण्यात आली.

सद्यःस्थितीत मॉर्गनला आघाडीच्या फलंदाजीत बदल करणे आवश्‍यक आहे. स्पर्धेत अद्याप युवा खेळाडू करुण नायरला संधी देण्यात आलेली नाही. त्याचा स्ट्राइक रेट 155.49 असून त्याने टी-20 सलामीस फलंदाजी करत दोन शतकही ठोकले आहेत. दुसरीकडे गोलंदाजांनी प्रभावित केले असून विशेषता सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती या जोडीने मोलाची कामगिरी केली आहे. यामुळे कोहली, डिव्हिलियर्स आणि मॅक्‍सवेल यांच्या विरोधात त्यांची आठ षटके महत्त्वाची ठरणार आहेत.

सामन्याची वेळ –

सायंकाळी : 7ः30
ठिकाण ः नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्‌सवर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.