#IPL2019 : अतितटीच्या सामन्यात बंगळुरूचा कोलकातावर रोमांचक विजय

कोलकाता – अखेरच्या षटकात मोईन अलीने केलेल्या चिवट गोलंदाजीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सचा 10 धावांनी पराभव करत स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत 213 धावांची मजल मारत कोलकातासमोर विजयासाठी 214 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात खेळताना कोलकाताला 20 षटकांत 5 बाद 203 धावांचीच मजल मारता आल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. प्रत्युत्तरात उतरलेल्या कोलकाताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर ख्रिस लिन केवळ 1 धाव करून तर सुनील नारायण 18 धावा करून परतल्यावर आलेले शुभमन गिल 9 धावा करून परतल्यानंतर रॉबिन उथप्पाला साथीत घेत नितीश राणाने फटकेबाजी करत कोलकाताची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला.

मात्र, उथप्पा 9 धावा करून परतल्यावर आलेल्या आंद्रे रसेल आणि नितीश राणा यांनी केवळ 8 षटकांत 118 धावांची भागीदारी करत सामन्यात रोमांच जागवला. मात्र, अखेरच्या षटकांत 24 धावांची गरज असताना कोलकाताला 14 धावाच करता आल्याने त्यांना सामना 10 धावांनी गमवावा लागला. यावेळी आंद्रे रसेलने 25 चेंडूत 65 धावांची खेळी केली तर नितीश राणाने नाबाद 85 धावा केल्या.

तत्पूर्वी, बंगळुरूच्या संघाची खराब सुरुवात झाली. सलामीवीर पार्थिव पटेल 11 धावा करून परतला. यानंतर विराट आणि अक्षदीप नाथने संघाला सहा षटकांमध्ये 42 धावांची मजल मारुन दिली. मात्र, अक्षदीप मोठा फटका मारण्याचा नादात बाद झाल्याने बंगळुरूला दुसरा धक्‍का बसला. यानंतर मोईन अली आणि विराट कोहलीने कोलकाताच्या गोलंदाजांची चौफेर धुलाई करत 13.1 षटकांत संघाला शंभरी ओलांडून दिली. यानंतर मोईन अलीने कुलदीप यादवच्या षटकात 27 धावांची वसूली करत आपले अर्धशतक झळकावले.

हे दोघे बंगळुरूला मोठी धावसंख्या उभारून देणार असे वाटत असताना मोईन अली 66 धावा करून परतला. तर, मोईन बाद झाल्यानंतर विराटने फलंदाजीचा गेअर बदलत फटकेबाजी करत त्याने आणि मार्कस स्टोइनिसने अखेरच्या चार षटकांमध्ये 64 धावांची भागीदारी करत बंगळुरूला 213 धावांची मजल मारून दिली. यावेळी कोहलीने 58 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 100 धावा फटकावल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.