#IPL : आयपीएल म्हणजे इंडियन पैसा लीग : डेल स्टेन

कोल्ह्याला द्राक्षे आंबट,

नवी दिल्ली -आयपीएल स्पर्धेत झगमगाट व पैसा यांचेच राज्य असते. आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग नव्हे तर इंडियन पैसा लीग आहे, अशा शब्दांत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने बीसीसीआयवर टीका केली आहे. विशेष म्हणजे स्टेनही या स्पर्धेत यापूर्वी खेळलेला असून यंदा त्याचे नावही लिलावाच्या यादीत नव्हते. त्यामुळे आपल्याला कोणत्याही संघाने विचारणा न केल्यामुळेच त्याने स्पर्धेवर टीका केली असून त्याची ही भूमिका म्हणजे, कोल्ह्याला द्राक्षे आंबट असाच प्रकार असल्याचे दिसून येत आहे. स्टेनने पाकिस्तानच्या एका यू-ट्यूब चॅनेलवर बोलताना ही टीका केली आहे.

आयपीएलमध्ये क्रिकेटलाच दुय्यम ठरवले जाते व पैसा आणि झगमगाट यांवरच जास्त भर दिला जातो. याउलट पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत मात्र, क्रिकेटलाच प्राधान्य दिले जाते. जेव्हा तुम्ही आयपीएल खेळायला जाता तेव्हा तिथे इतके मोठे संघ, इतकी मोठी नावे असतात आणि खेळाडूंच्या कमाईवर इतका भर दिला जातो की ज्यामुळे क्रिकेट मागे पडते, असेही त्याने म्हटले आहे.

आयपीएलमध्ये तुम्हाला भेटणारे अनेक क्रिकेटप्रेमी किती पैसे मिळाले हेच विचारतात. त्यामुळेच मी यापासून दूर राहात आहे. त्याने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतल्याचे सांगितले जात असले तरीही त्याच्यावर कोणीही बोली लावली नसल्यानेच त्याने नैराश्‍यामुळे पाकिस्तान लीग व श्रीलंका लीगचे कौतुक करताना आयपीएलवर टीका केली आहे.

एकेकाळी स्टेन हा विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर बेंगळुरूकडून खेळत होता. त्याचे नाव लिलाव होत असलेल्या खेळाडूंच्या यादीतही नसल्यानेच त्याने स्पर्धेतून माघार घेत असल्याचे सांगितले. मात्र, त्याचवेळी त्याने पाकिस्तान व श्रीलंका येथील लीगमध्ये मात्र सहभागी होण्याचे निश्‍चित केले. अर्थात, पाकिस्तान लीगमध्ये त्याला आतापर्यंतच्या सामन्यांत तरी सरस कामगिरी करता आलेली नाही.

बुधवारी झालेल्या सामन्यात तर त्याच्या 2 षटकांतच 44 धावा काढल्या गेल्यामुळे या स्पर्धेत सुरुवातीच्या सामन्यांत तरी त्याच्या हाती यश लागलेले नाही. मात्र, आयपीएलमध्ये संधी मिळणार नाही हे सिद्ध झाल्यामुळेच त्याने ही टीका केल्याचे बोलले
जात आहे.

स्टेनचा माफीनामा

आयपीएलवर टीका केल्याने अडचणीत आलेल्या डेल स्टेनला बुद्धी सूचली व त्याने तातडीने आपला माफीनामाही जाहीर केला. माझ्या बोलण्याचा माध्यमाने विपर्यास केल्याचेही त्याने सांगितले. आयपीएल स्पर्धेत मी देखील खेळलो आहे त्यामुळे अशी टीका कशी करीन हे सांगतानाच स्टेनने आयपीएलमुळेच जगातील जवळपास सर्वच संघांना मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी सेकंड बेंच मिळाला असल्याचेही मान्य केले. जगभरात सुरू असलेल्या टी-20 क्रिकेट लीगमधील सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणून आयपीएलकडे पाहिले जाते. तसेच या स्पर्धेत खेळूनच आपल्याला आक्रमक फलंदाजांसमोर कशी गोलंदाजी करायची याचा धडाही मिळतो, अशा शब्दात स्टेनने आपल्या वक्तव्याबद्दल सारवासारव केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.