मुंबई -शुक्रवारी गुजरात टायटन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवने इतिहास रचला. मुंबईसाठी या महत्त्वाच्या सामन्यात त्याने वेगवान फलंदाजी करताना 103 धावांची नाबाद खेळी केली. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने गुजरातचा 27 धावांनी पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 218 धावा केल्या. त्याचवेळी विजयासाठी 219 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी गुजरात संघाला 8 बाद 191 धावा करता आल्या. या सामन्यातील सूर्याचे शतक पाहून विराट कोहली, हरभजन सिंग, जोफ्रा आर्चर, इरफान पठाण यांच्यासह अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक केले आहे. सूर्यकुमार यादवचे आयपीएलमधील हे पहिले शतक होते.
गुजरात विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते पाहून विराट कोहली दंग झाला. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे सूर्याचे विशेष कौतुक केले. विराटने त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिले, “तुला मानला रे भाऊ’. यावेळी विराटने सूर्यकुमार उत्कृष्ट फलंदाज असल्याचेही मान्य केले. त्याच्याशिवाय इरफान पठाण, हरभजन सिंग आणि जोफ्रा आर्चरसह अनेक क्रिकेटपटूंनीही सूर्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
ऑरेंज कॅप सूर्याच्या टप्प्यात
गुजरात टायटन्स विरुद्ध धडाकेबाज खेळी केल्यानंतर सूर्यकुमार यादव ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सामील झाला आहे. सूर्यामुळे फाफ डू प्लेसिस आणि यशस्वी जैस्वालचे टेंशन वाढले आहे. सध्या आयपीएल 2023 ची ऑरेंज कॅप फाफ डू प्लेसिसकडे आहे. त्याने आतापर्यंत सर्वाधिक 576 धावा केल्या आहेत. तर यशस्वी जैस्वाल 575 धावा करून दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार 479 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
सूर्यकुमार यादवने आज आकाश उजळून टाकले. त्याने संपूर्ण डावात उत्कृष्ट फटके खेळले, पण थर्ड मॅनच्या चेंडूवरचा तो शानदार षटकार माझ्यासाठी वेगळा ठरला. त्याने बॅटचा चेहरा कोन बदलून ज्या पद्धतीने खेळला, ते करणे फार कठीण आहे. जागतिक क्रिकेटमधील फारसे फलंदाज तो शॉट खेळू शकत नाहीत.
– सचिन तेंडुलकर,माजी क्रिकेटपटू