जयपूर – रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्धच्या लढतीत अवघ्या 59 धावांवर डाव संपुष्टात आल्याने राजस्थान रॉयल्सला लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने त्यावर काय बोलू असा प्रतिप्रश्न करत मौन बाळगले आहे.
यंदाच्या स्पर्धेत राजस्थानचा संघ सर्वात प्रबळ मानला जात होता. मात्र, सुरुवातीच्या काही सामन्यांनंतर त्यांच्या कामगिरीचा आलेख खालावला. त्यातच बंगळुरूकडून त्यांना अत्यंत मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्याने कर्णधार सॅमसनसह सर्वच खेळाडूंवर प्रचंड टीकाही सुरू झाली.
यावर काहीही बोलू शकत नसल्याचे जरी सॅमसन म्हणत असला तरीही त्याला आपली निराशा लपवता आली नाही. आम्ही या सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तीनही विभागात अत्यंत लाजीरवाणी कामगिरी केली. संघातील सर्वच फलंदाजांनी जबाबदारी ओळखून खेळ केला असता तर हे घडले नसते.
मात्र, आम्ही यातून बाहेर येऊ व निश्चितच प्लेऑफमध्ये स्थान मिळवू असे त्याने सांगितले. या सामन्यात भरात असलेला फलंदाज यशस्वी जयस्वाल खाते न उघडताच परतला व त्यानंतर राजस्थानचे सर्व दिग्गज फलंदाज एका पाठोपाठ बाद होत गेले. या पराभवामुळे त्यांच्या स्पर्धेतील आव्हानालाही धक्का लागला आहे.