मुंबई – व्यंकटेश अय्यरच्या शतकी खेळीनंतरही कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल स्पर्धेत रविवारी झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला. कोलकाताने विजयासाठी दिलेल्या 186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा व इशान किशन या जोडीने 65 धावांची सलामी दिली. रोहित 13 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारांसह 20 धावा करुन परतला. त्यानंतर इशानने धडाकेबाज फलंदाजी केली.
तो अवघ्या 25 चेंडूत 5 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 58 धावांवर बाद झाला. नेतृत्व करत असलेला सूर्यकुमार यादव यापूर्वीच्या सामन्यांत अपयशी ठरत होता. यावेळी मात्र, त्याने जाबदारीने फलंदाजी केली. तिलक वर्मा 25 चेंडूत 3 चौकार व 1 षटकारासह 30 धावा केल्या. सूर्यकुमार 25 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारांसह 43 धावा करुन परतला. पाठोपाठ नेहाल वधेरा बाद झाला. मात्र, टीम डेव्हीडने नाबाद 24 धावांची खेळी करताना संघाचा विजय साकार केला.
तत्पूर्वी, व्यंकटेश अय्यरने फटकावलेल्या अफलातून शतकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सला 20 षटकांत 6 बाद 185 अशी मजल मारता आली. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत होता. कोलकाताचा सलामीवीर एन. जगदीशन खाते उघडण्यापूर्वीच तंबूत परतला. त्यानंतर व्यंकटेश अय्यरने जबाबदारीने फलंदाजी केली. रेहमनुल्ला गुरबाज 8 धावांवर बाद झाला.
कर्णधार नितिश राणा अपयशी ठरला. शार्दुल ठाकूरने 13 धावा करताना अय्यरसह संघाचे शतक फलकावर लावले. भरात असलेल्या रिंकू सिंगने 18 धावांची खेळी करताना संधाला दीडशतकी मजल मारुन दिली. एका बाजूने अय्यर वादळी फलंदाजी करत होता. त्याने शतकही थाटात साकार केले. मात्र, त्यानंतर तो लगेचच बाद झाला. रिंकू सिंगही बाद झाला. मात्र, रसेल 11 चेंडूत 3 चौकार व 1 षटकारासह 21 धावा केल्या.
अखेर अर्जुनला संधी मिळाली
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन याला अखेर यंदाच्या आयपीएल स्पर्धेत अंतिम 11 खेळाडूंच्या संघात मुंबई इंडियन्सने संधी दिली. त्यामुळे आयपीएल स्पर्धेत पदार्पण करण्याची त्याची तब्बल दोन वर्षांची प्रतीक्षा संपली.