लोणी काळभोर – अवघ्या दीड महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका तरुण शेतकऱ्याचा अंगावर शेतात काम करत असताना वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत घडली.
दीपक दशरथ काळभोर (वय 29, रा. तरवडी, लोणी काळभोर) असे तरुणाचे नाव आहे. त्याचा विवाह दीड महिन्यापूर्वीच झाला आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दीपक काळभोर आपल्या शेतात काम करत असताना अचानकपणे त्यांच्या अंगावर वीज कोसळली.
दीपक काळभोर आणखी शेतातून घरी न आल्याने घरच्यांनी शेतात जाऊन पाहणी केली असता दीपक काळभोर हे जमिनीवर पडल्याचे दिसून आले. त्यांना तत्काळ लोणी काळभोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याची माहिती दिली. यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे.