बेंगळुरू – आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये खेळाडूंवर कोट्यवधींची बोल लागत आहे. या लिलावात अनेक खेळाडू मालामाल झाले आहेत. मुंबई इंडियन्सने अपेक्षाप्रमाणे ईशान किशनला आपल्या ताफ्यात घेतले आहे. मुंबईने ईशान किशनसाठी तब्बल 15.25 कोटी रुपये मोजले आहेत. आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवशी ईशान किशन सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
मागील पर्वामध्येही ईशान मुंबईच्या संघातच होता. मात्र संघाने त्याला रिटेन केले नव्हते. ईशानची बेस प्राइज दोन कोटी रुपये इतकी होती. म्हणजेच त्याला बेस प्राइजपेक्षा सात पट अधिक रक्कम देत विकत घेण्यात आले. मुंबईबरोबरच इतरही अनेक संघांनी ईशानसाठी मोठी बोली लावली होती. मात्र मुंबईने या शर्यतीमध्ये बाजी मारली. ईशान पहिल्यांदा मुंबईकडून खेळलेला तेव्हा त्याला 6.2 कोटी रुपये मिळाले होते. म्हणजेच त्याला यंदा 9 कोटी रुपये अधिक मिळाले आहे.
तसेच बेबी एबी म्हणून प्रसिद्ध झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविससाठी पंजाब, मुंबई आणि चेन्नईने बोली लावली. नुकत्याच झालेल्या अंडर 19 वर्ल्डकपमध्ये ब्रेविसने मालिकावीर पुरस्कार पटकावला होता. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. मुंबईने ब्रेविसला 3 कोटींमध्ये संघात दाखल केले.
तत्पूर्वी, पहिल्या काही तासांमध्ये लागलेल्या बोलीमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने मोठी खरेदी करत मुंबईकर श्रेयस अय्यरला आपल्या संघात स्थान दिले आहे. श्रेयस अय्यर हा यंदाच्या आयपीएल लिलावामधील पहिला खेळाडू ठरला ज्याला दहा कोटींहून अधिकची बोली लावत विकत घेण्यात आले. कोलकाता संघाने सव्वा बारा कोटींना श्रेयसला आपल्या संघात घेतले. श्रेयसकडे कोलकात्याचा संघ संभाव्य कर्णधार म्हणून पाहिले जात आहे.
कोणत्या संघाने कुणाला घेतले?
चेन्नई सुपर किंग्ज – ड्वेन ब्रावो (4.4 कोटी), अंबाती रायडू (6.75 कोटी), रॉबिन उथप्पा (2 कोटी), दीपक चहर (14 कोटी).
मुंबई इंडियन्स – ईशान किशन (15.25 कोटी), डेवाल्ड ब्रेविस (3 कोटी).
दिल्ली कॅपिटल्स- डेव्हिड वार्नर (6.25 कोटी), मिशेल मार्शची (6.50 कोटी).
कोलकाता नाईट रायडर्स – श्रेयस अय्यर (12.25 कोटी), पॅट कमिंस (7.25 कोटी), नितीश राणा (8 कोटी).
गुजरात टायटन्स – मोहम्मद शामी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – फाफ डू प्लेसीस (7 कोटी), हर्षल पटेल (10.75), वानिंदु हसरंगा (10.75 कोटी), दिनेश कार्तिक (5.50 कोटी), जॉश हेजलवूड (7.5 कोटी)
लखनऊ सुपर जायंट्स- मनीष पांडेला (4.60 कोटी), जेसन होल्डर (8.75 कोटी), दीपक हुड्डा (5.75 कोटी), कृणाल पांड्या (8.75), क्विंटन डी कॉक (6.75)
राजस्थान रॉयल्स- आर अश्विन (5 कोटी), ट्रेन्ट बोल्ट (8 कोटी), शिमरॉन हेटमायर (8.50 कोटी), देवदत्त पडीकल (7.50 कोटी), रियान पराग (3.80 कोटी)
पंजाब किंग्ज – शिखर धवन (8.25 कोटी), कगिसो रबाडा (9.25 कोटी), जॉनी बेयरेस्टो (6.75),
सनरायझर्स हैदराबाद- वॉशिंन्टन सुंदर ( 8.75 कोटी), निकलस पूरन (10.75 कोटी), टी नजराजन (4 कोटी),
दरम्यान, लिलावाआधी 10 संघांनी 33 खेळाडूंना रिटेन केले आहे. प्रत्येक संघाला किमान 18 तर सर्वाधिक 25 खेळाडू संघात घेण्याची मूभा आहे. यंदा लिलावामध्ये प्रत्येक संघाला खेळाडूंवर 90 कोटी रुपये खर्च करण्याची मर्यादा आहे.
आर्यन, सुहानाने वेधले लक्ष
या लिलावाच्या ठिकाणी अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान यांनी हजेरी लावली आहे. तसेच त्यांच्यासोबतच अभिनेत्री जुही चावलाची मुलगी जान्हवी मेहताही हजर असल्याने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. अभिनेता शाहरूख खान हा कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा मालका, जुही चावला को-ओनर आहे. आयपीएलच्या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये आर्यन आणि सुहाना हे केकेआरच्या व्यवस्थापकीय सदस्यांसोबत बसलेले दिसले. दुसरीकडे पंजाब किंग्स संघाची को-ओनर अभिनेत्री प्रिती झिंटा ही गैरहजर राहिली. याबाबत तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली.
सूत्रसंचालक भोवळ येऊन कोसळले
आयपीएलचा मेगा ऍक्शन सुरु असताना सुत्रसंचालक ह्यू एडमिड्स हे अचानक भोवळ येऊन खाली कोसळले. या घटनेमुळे लीलावावेळी काही काळ गोंधळ उडाला. श्रीलंकेचा फिरकीपटू वनिंदू हसरंगासाठी बोली लावली जात असताना ह्यू एडमीड्स अचानक जमिनीवर कोसळले. त्यामुळे ऑक्शन थांबवण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, ह्यू एडमीड्स यांना ऑक्शन आयोजित करण्याचा 35 वर्षांपेक्षा अधिक अनुभव आहे. त्यांनी जागतिक स्तरावर 2,500 हून अधिक ऑक्शन सुत्रसंचालन केले आहे. याशिवाय, त्यांना 2.7 बिलियन पौंड्सच्या तब्बल 310,000 लॉट पेक्षा जास्त खेळाडू, वस्तू आणि इतर गोष्टींचे ऑक्शन केले आहे.