खडकवासला (प्रतिनिधी) – मी सातवीमध्ये असताना वर्तमानपत्रात एक बातमी वाचली की, रिक्षावाल्यांची मुलगी सीए झाली आणि तेथेच मीही ठरवले की आपणही सीए व्हायचे. माझ्या यशाचे संपूर्ण श्रेय माझ्या कुटुंबीयांना आहे, असे “सीए’ परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या भाग्यश्री चव्हाण हिने सांगितले.
डोणजे येथील भाग्यश्री चव्हाण हिने “सीए’ परिक्षेत यश संपादन केले आहे. याबद्दल पंचक्रोशीतील नागरिकांकडून तिचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ती बोलत होती.
भाग्यश्री म्हणाली की, आई गृहिणी तर वडील रिक्षाचालक आहेत. आर्थिक परिस्थिती काहीशी हालखीची होती. त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व शालेय जिवनातच समजले. डोणजे, गोळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. नितीन वाघोले, प्रितम पंलाडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, डोणजे, गोळेवाडी तसेच गावकऱ्यांनी मोलाची साथ दिली. गाडी प्रवास करणे शक्य नव्हते तेंव्हा गाववाल्यांनी केलेली मदत मी कधीच विसरणार नाही.
यावेळी भाग्यश्रीचे वडील मारूती चव्हाण, सरपंच शितल भामे, महेश वाल्हेकर, माजी सरपंच नामदेव निडाळकर, माजी उपसरपंच तेजस कोडीतकर, सिताराम गोळे, अभिषेक अवसरे, अंकुश चव्हाण, मनोहर चव्हाण, बापू चव्हाण आदि उपस्थित होते.