IPL 2021 : सांघिक खेळाने चेन्नईची बेंगळुरूवर मात

शारजा – महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने हायव्होल्टेज लढतीत सांघिक खेळाच्या जोरावर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाचा 6 गडी राखून पराभव केला. यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या सुरू झालेल्या या दुसऱ्या पर्वातील सामन्यात चेन्नईने विजय मिळवताना क्वॉलिफायर गटातील प्रवेशाची आशा कायम राखली.

बेंगळुरूने विजयासाठी दिलेले 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने दमदार सलामी दिली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड व फाफ डुप्लेसी यांनी बेंगळुरूच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखताना 71 धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. हे दोघे बाद झाल्यावर मोईन अली व अम्बाती रायडू यांनीही आपला वाटा उचलला.

त्यानंतर हे दोघेही तंबूत परतले. त्याचवेळी आयपीएल स्पर्धेचा स्पेशालिस्ट सुरेश रैना व कर्णधार धोनी यांनी संघाचा विजय साकार केला. बेंगळुरूकडून हर्षल पटेलने 2 गडी बाद केले. यजुवेंद्र चहल व ग्लेन मॅक्‍सवेल यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.

कर्णधार विराट कोहली व देवदत्त पडीक्‍कल यांच्या दमदार अर्धशतकी खेळीनंतरही चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर बेंगळुरूला दीडशतकी धावांवर रोखले. आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातील दुसऱ्या पर्वातील लढतीत कोहली व महेंद्रसिंह धोनी या दिग्गज खेळाडूंच्या संघातील या हायव्होल्टेज लढतीत मोठी धावसंख्या उभारली जाणार ही अपेक्षा फोल ठरली.

धोनीने नाणेफेक जिंकत बेंगळुरूला प्रथम फलंदाजी दिली. सुरुवातीला कोहली व पडीक्‍कलच्या आक्रमक खेळीमुळे त्याचा हा निर्णय चुकीचा ठरणार अशी शक्‍यता निर्माण झाली. मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी सामन्यावर नियंत्रण राखले.

विशेषतः ड्‌वेन ब्राव्होने डेथ ओव्हर्समध्ये एबी डीविलियर्स, ग्लेन मॅक्‍सवेल यांच्यासारख्या आक्रमक फलंदाजांवर सातत्याने दडपण राखले व त्यांना मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले. 

डावाची सुरुवात केल्यावर कोहली व पडीक्‍कलने यंदाच्या स्पर्धेत प्रथमच बेंगळुरू संघाला शतकी सलामी दिली. 111 या नेल्सन फिगरवर कोहली बाद झाला. त्याने आपल्या 53 धावांच्या खेळीत 41 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 1 षटकार फटकावत पहिल्या दहा षटकांत वर्चस्व राखले.

पडीक्‍कलने जास्त आक्रमक फलंदाजी केली. त्याने आपल्या 70 धावांच्या खेळीत 50 चेंडूत 5 चौकार व 3 षटकार अशी आतषबाजी केली. मात्र, हे दोघे बाद झाल्यावर उर्वरित सामन्यात चेन्नईने बेंगळुरूला 20 षटकांत 6 बाद 156 असे रोखले. चेन्नईकडून ड्‌वेन ब्राव्होने 3 तर, शार्दुल ठाकूरने 2 गडी बाद केले.

आजचे सामने –

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
दुपारी : 3ः30
ठिकाण ः अबुधाबी
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्‌स 1

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज
सायंकाळी : 7ः30
ठिकाण ः शारजा
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्‌स 1

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.