- मित्राकडून महिलेला साडेनऊ लाखांचा गंडा
पिंपरी – इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या एकाने महिलेशी मैत्री करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळी कारणे पुढे करीत तिच्याकडून वेळोवेळी नऊ लाख 66 हजार 883 रुपये घेतले. ते पैसे परत न करता महिलेची फसवणूक केली. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2 ऑक्टोबर 2019 ते 3 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली.
ली वॉंग (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने शनिवारी (दि. 3) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला ही मूळची मध्य प्रदेशातील असून सध्या पिंपळे सौदागर परिसरात राहण्यास आहे. आरोपी ली वॉंग आणि फिर्यादी महिला यांची ओळख इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून झाली.
त्यानंतर त्यांच्या मैत्रीमध्ये वाढ होत गेली. आरोपी वॉंग याने फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला वेगवेगळी कारणे देत तिच्याकडून वेळोवेळी नऊ लाख 66 हजार 883 रुपये घेतले. महिलेने ते पैसे परत मागितले असता आरोपीने पैसे न देता महिलेचा विश्वासघात व फसवणूक केली. सांगवी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक कुमटकर याबाबत अधिक तपास करीत आहेत.