- शहर राष्ट्रवादीमध्ये घातले लक्ष; सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील धार अधिक तीव्र होणार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला अद्यापही सव्वा वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. तरीही पक्षीय पातळीवर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरावर एकहाती 15 वर्षे अधिराज्य गाजविणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची सूत्रे खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे सोपविल्याचे समोर आले आहे. त्यांनीही महापालिकेत लक्ष घालण्याचे संकेत दिल्यामुळे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि राष्ट्रवादीमधील कलगीतुरा अधिकच जोर धरण्याची शक्यता बळावली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची 15 वर्षे एकहाती सत्ता होती. मात्र सन 2014 साली विधानसभेदरम्यान झालेल्या पक्षांतराचा तसेच मोदी लाटेचा सन 2017 साली झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसला होता. या दोन्ही बाबी कारणीभूत असल्या तरी अंतर्गत कलह, अजित पवारांचे दुर्लक्ष, शहरवासीयांना गृहित धरण्याची केलेली चूक याचाही फटका राष्ट्रवादीला बसला होता. यातून गेल्या साडेतीन वर्षांत या पक्षाने कोणतेही शहाणपण घेतले नसल्याचेच दिसून येत होते. मात्र राज्यात आलेली सत्ता, करोनाचा काहीसा कमी झालेला प्रादुर्भाव यानंतर राष्ट्रवादीही निवडणुकीच्या तयारीसाठी सरसावल्याचे पहावयास मिळत आहे.
अजित पवार हेच शहर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आजपर्यंत होते. त्यांचा “शब्द’ हा अंतिम मानला जात होता. मात्र सध्या त्यांच्याकडे असलेले उपमुख्यमंत्री आणि राज्यातील जबाबदारी पहाता शहराची सूत्रे त्यांनी आता खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे दिल्याचे काहीअंशी समोर आले आहे. राष्ट्रवादीच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत त्याचेच प्रतिबिंब पहावयास मिळाले. अमोल कोल्हे यांनी “आता केवळ ट्रेलर, पिक्चर तर पुढे आहे’ हे त्यांचे वक्तव्य बरेच काही सांगून गेले आहे. प्रत्येक सर्वसाधारण सभेदरम्यान आपण महापालिकेत हजेरी लावणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने सत्ताधाऱ्यांवर एकअंशी दबाव निर्माण करण्यात त्यांना यश आल्याचेही बोलले जात आहे.
गेल्या साडेतीन वर्षांत सत्ताधाऱ्यांच्या “ताटाखालचे मांजर’ बनलेल्या राष्ट्रवादीला कोल्हे यांच्या माध्यमातून किती बळ मिळणार? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या साडेतीन वर्षांत महापालिकेत झालेला भ्रष्टाचार, अनावश्यक शेकडो कोटींच्या निविदा, अंधारात घेतले गेलेले निर्णय, अपूर्णावस्थेतील चोवीस तास पाणीपुरवठ्याची योजना, निकृष्ट दर्जाची कामे, करोना काळात झालेला कोट्यवधींचा अपहार या बाबींवर राष्ट्रवादी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे कोल्हे यांनी म्हटल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमधील कलगीतुरा अधिकच रंगणार असल्याचे अधोरेखित झाले आहे. कोल्हे यांनी जाहीर केलेली भूमिका प्रत्यक्षात येते की राष्ट्रवादीचे नेहमीप्रमाणे “ये रे माझ्या मागल्या’ ही भूमिका कायम राहते याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीचेही हात दगडाखाली
महापालिकेत सत्ता भाजपाची असली तरी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची भली मोठी कामे, टेंडरमध्ये भागीदारी असल्याने या पक्षातील बहुतांश नेत्यांचे हात दगडाखाली असल्यामुळे कोल्हे यांना ते किती साथ देतील हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. बोटावर मोजण्याइतकेच नगरसेवक अथवा राष्ट्रवादीच्या नेत्यांचे अद्यापतरी हात बरबटलेले नाहीत. या नेत्यांच्या बळावरच कोल्हे यांना महापालिकेत तगडी भूमिका घ्यावी लागणार आहे.
शिवसेनेसोबतच्या मैत्रीचा फायदा?
खासदार अमोल कोल्हे हे पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते. त्यांचे शहरातील शिवसेना नेत्यांशी आजही जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राज्यात महाआघाडीच्या माध्यमातून हे दोन्ही पक्ष एकत्र असल्याने महापालिका निवडणुकीतही या पक्षांची आघाडी होण्याची शक्यता आहे. आघाडी करताना तसेच एकत्र निवडणूक लढविताना कोल्हे यांच्याकडे असलेल्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा फायदाच दोन्ही पक्षांना होऊ शकतो, असा मतप्रवाह सध्या शहरात ऐकावयास मिळत आहेत.
भाजपा विरोधासाठी एकी महत्त्वाची
पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाची शहरात सध्या मोठी ताकद आहे. सत्ता, पैसा आणि साम, दाम, दंड आणि भेदाची भूमिका घेणारे नेतेही या पक्षाकडे आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय या नेत्यांचा शब्द हा प्रमाण मानला जातो. त्यामुळे सध्या तरी याच पक्षाचे पारडे जड मानले जात आहे. शहरवासीयांमध्ये भाजपाबद्दल निर्माण झालेली नाराजीची भावना मतांमध्ये परिवर्तन करण्याची किमया राष्ट्रवादीच्या नेत्यांना करावी लागणार आहे. त्यामुळे या पक्षाची स्थानिक पातळीवरील एकी खूपच महत्त्वाची मानली जात आहे. खासदार अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पार्थ पवार स्थानिकांची मोट कशी बांधतात यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे.