सातारा – दारूच्या नशेतच पुतण्याने चुलत्याच्या गळ्यावर वार करून खून केल्याची घटना कारंडेवाडी (कुकुडवाड) ता. माण येथे सोमवारी रात्री घडली. लक्ष्मण आण्णा चव्हाण (वय 48) असे मृताचे नाव असून पुतण्या संदीप वसंत चव्हाण हा खून करून पसार झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत लक्ष्मण व संशयित संदीप हे दोघे एकाच घरात राहण्यास होते. त्यांच्यात सतत किरकोळ कारणावरून भांडण होत असे. त्याच भांडणाच्या रागातून संदीपने सोमवारी रात्री चुलता लक्ष्मणच्या गळ्यावर धारधार शस्त्राने सपासप वार करून खून केला. त्यानंतर घटनास्थळावरून तो पळून गेला. घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.