संगमनेर -तालुक्यातील अंभोरे शिवारात दोन शेतकरी कुटुंबांत शेत जमिनीच्या वादातून झालेल्या तुफान हाणामारीत सहा जण जखमी झाले. रविवारी (दि. 17) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांत परस्पर विरोधी फिर्यादीवरुन 22 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संगमनेर तालुका पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीवरुन, अंभोरे शिवारात बापू तुळशीराम खेमनर यांची शेतजमीन आहे. यामध्ये त्यांचा चुलतभाऊ बबन तुकाराम खेमनर हा ट्रॅक्टरद्वारे रोटा मारत होता. त्याचवेळी बाबूराव गवाजी खेमनर, लहानू गेणू खेमनर, धर्मनाथ पाराजी खेमनर, जालिंदर गेणू खेमनर, नंदाबाई बाबूराव खेमनर व आशाबाई धर्मनाथ खेमनर (सर्व रा. अंभोरे) यांनी ही शेतजमीन आमची असून, तुम्ही रोटा का मारता? असे म्हणून गैर कायद्याने जमाव जमवून दमदाटी व शिवीगाळ केली. तसेच चुलतभावावर कुऱ्हाडीने व कोयत्याने वार करुन जखमी करत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी बापू खेमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सहा जणांविरोधात तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तसेच या प्रकरणी बाबूराव गवाजी खेमनर यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. आमच्या गट क्रमांक 82/02 मधील शेतातील गिन्नी गवत, आंबा व शेवग्याच्या झाडांवर रोटा घालून मोठे नुकसान केले. तसेच गैर कायद्याने जमाव जमवून पत्नी नंदाबाई बाबूराव खेमनर, मुले हौशाबापू बाबूराव खेमनर, संदीप बाबूराव खेमनर फिर्यादीचा चुलतभाऊ लहाणू गेणू खेमनर, धर्मराज पाराधी खेमनर, जालिंदर गेणू खेमनर यांना भाऊसाहेब तुळशीराम खेमनर, पाटीलबा तुकाराम खेमनर, बबन तुकाराम खेमनर, नामदेव तुळशीराम खेमनर, आशिष पाटीलबा खेमनर, बाबासाहेब बबन खेमनर, एकनाथ बबन खेमनर, शुभम पाटीलबा खेमनर, अजित भाऊसाहेब खेमनर, भाविक भाऊसाहेब खेमनर, विठाबाई भाऊसाहेब खेमनर, हिराबाई पाटीलबा खेमनर, जिजाबाई ऊर्फ विठाबाई बापू खेमनर, अनिता नामदेव खेमनर, मनीषा नामदेव खेमनर व वैशाली एकनाथ खेमनर (सर्व रा. अंभोरे) यांनी कुऱ्हाडीने व काठीने मारहाण करुन जखमी करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन पोलिसांनी सोळा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार ए. व्ही. जांभूळकर हे करत आहेत.