पुणे – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (सीएसआयआर-एनसील)च्या शास्त्रज्ञांनी बायोपॉलिमरचे नॅनोकोटिंग असलेले विशिष्ट प्रकारचे मास्क तयार केले आहे. बाजारात मिळणाऱ्या मास्कपेक्षाही त्याची कार्यक्षमता अधिक असल्याचे “एनसीएल’ने म्हटले आहे.
शास्त्रज्ञांनी “स्पन बॉंड पॉलिप्रोपीलीन’ या वैद्यकीय श्रेणीच्या कपड्याचा वापर करून हा मास्क बनविला आहे.
कोयंबतूर येथील दक्षिण भारत वस्त्र संशोधन संघटना (सिट्रा) या शासकीय मान्यताप्राप्त नोडल एजन्सीने “एनसीएल’ने बनविलेल्या मास्कची तपासणी केली आहे. “एनसीएल’चे शास्त्रज्ञ डॉ. सय्यद दस्तगीर, डॉ. महेश धरणे, डॉ. शुभांगी उंबरकर यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या गटाने या मास्कची निर्मिती केली आहे.
जीवाणू फिल्टरेशनची कार्यक्षमता, द्राव्य घटकांच्या फिल्टरेशनची कार्यक्षमता, श्वासोच्छवास, ज्वलनशीलता आदी विविध मापदंडांचा अभ्यास करून मास्क बनवला आहे. सीएसआयआर-एनसीएलने पुणे स्थित सेटलॅब इंडिया या लघु, लघु आणि मध्यम उद्योग कंपनीला या तंत्रज्ञानाचा परवाना दिला आहे. सीएसआयआरच्या कोविड-19 साठीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वेगवान स्वदेशी उत्पादनासाठी हे तंत्रज्ञान हस्तांतरित केले आहे.