पंतप्रधान मोदी, लालूप्रसाद यादव यांची मुलाखत घ्यायचीय

सुधीर गाडगीळ यांचा आशावाद

आळंदी-आजपर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रगट मुलाखती घेऊन त्यांच्यातील विविध पैलू जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असला, तरी आता दोन व्यक्तींच्या मुलाखती घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे बिहारमधील ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादव यांचा समावेश आहे, असे ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले.

गाडगीळ यांचा “मुलखावेगळी माणसे’ हा कार्यक्रम आळंदीतील स्वानंद स्वामी मठात आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सुधीर गाडगीळांनी गेल्या 50 वर्षांत 4 हजार विविध क्षेत्रांतील सामान्य माणसांपासून मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या. यातून विविध नवीन पैलू माहिती झाल्याचे सांगत सुधीर गाडगीळ म्हणाले, माझ्यावर आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांचा प्रभाव आहे. पुलंकडून विषयाची मांडणी कशी करावी तर अत्रेंकडून उत्स्फूर्तता शिकलो. शरद दत्तात्रेय कुळकर्णी या सर्वात उंच असलेल्या माणसाला भेटलो आणि त्यांची मुलाखत घेतली.

कुळकर्णी यांना बॅंकेत घेऊन गेलो आणि त्यांना बॅंकेने नोकरी दिली. पेपर विकणारा बाबूराव आणि भंगाराचे सामान विकणारी आजीबाई या रस्त्यावर भेटलेल्या दोन व्यक्तीचे अनुभव सांगताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. संगीत क्षेत्रात लता मंगेशकर, आशा भोसले, भीमसेन जोशी यांच्यासह अनेकांच्या मुलाखती घेतल्या. लता मंगेशकर 11 मिरच्या खातात ही माहिती एका हॉटेलच्या उद्‌घाटन प्रसंगी मुलाखत घेताना कळली तर स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी जलद गतीने गाडी चालवतात हे सुद्धा त्यांच्याशी संवाद साधताना कळले. इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे या राजकीय क्षेत्रातील नेत्यांशी संवाद साधताना त्यांच्यातील वेगळ्या पैलूंची माहिती मिळाली.

Leave A Reply

Your email address will not be published.