रंगा रेड्डी (तेलंगण) – पेट्रोलपंपांवर बसवण्यात आलेल्या पेट्रोल वितरण मशिनमध्ये फेरफार करून इंधन चोरी करणारी एक टोळी तेलंगण पोलिसांनी उघड केली आहे. सायबराबाद आणि नंदिगाम पोलिसांनी ही कामगिरी केली असून 13 जणांना अटक करण्यात आली आहे.
तेलंगण आणि आंध्रप्रदेशातील वेगवेगळ्या पेट्रोल पंपांवर बसवण्यात आलेल्या पेट्रोल वितरण यंत्रांमध्ये फेरफार करून ते पेट्रोलची चोरी करत असत. या संदर्भात पोलिसांनी 14 आयसी, 8 डिस्प्ले, 3 जीबीआर केबल, मदरबोर्ड या साहित्याबरोबर एका आरोपीकडून ह्युंदाई आय 10 कार जप्त केली आहे.
शुभानी बाशा असे अटक केलेल्या एका आरोपीचे नाव असून तो पूर्व आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील फ्युएल स्टेशनवर पंप मेकॅनिक म्हणून गेल्या 10 वर्षांपासून काम करत आहे. पेट्रोल वितरण यंत्रात फेरफार केल्यामुळे आंध्रप्रदेश आणि तेलंगण राज्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2018 पासून देशभरातील सर्व पेट्रोल पंपांसाठी नवीन सॉफ्टवेअर वापरात आले. मात्र आरोपी दोनपैकी एकाच पंपावर आयसी बसवत असत. वाहनात पेट्रोल भरण्यासाठी या आयसी बसवलेल्या पंपाचा वापर केला जात असे आणि बाटली, कॅनमधून सुटे पेट्रोल घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांसाठी नियमित पंपातून पेट्रोल दिले जात असायचे.
जवळपास वर्षभर ही पेट्रोल चोरी सुरू होती. 5 आणि 6 सप्टेंबर रोजी सायबराबाद पोलीस आणि तेलंगण स्टेट लीगल मीटरॉलॉजी डिपार्टमेंटने संयुक्तपणे छापे घालून ही टोळी उघडकीस आणली. पेट्रोल चोरीच्या युक्तीबाबत इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनला कळवण्यात आली आहे.