वाघोली (पुणे) – वाघोली-आव्हाळवाडी रस्त्याच्या कॉंक्रीटीकरण कामास शनिवारी (दि. 5) सुरुवात करण्यात आली आहे. सटवाई मंदिर ते खंडोबा मंदिरापर्यंत 7 मीटर रुंद रस्त्याचे काम वाघोली ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून करण्यात येत आहे. रस्ता पूर्ण होईपर्यंत जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. चारचाकी व दुचाकी वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.
वाघोली-आव्हाळवाडी रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली होती. आव्हाळवाडी ग्रामस्थ व वाघोलीतील नागरिकांकडून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची अनेक दिवसांची मागणी होती. ग्रामपंचायत सदस्य संदीप सातव, मालती गोगावले, जयश्री काळे यांच्या प्रयत्नाने ग्रामनिधीतून सटवाई मंदिर ते खंडोबा मंदिरापर्यंत 7 मीटर रुंद रस्त्याचे कॉंक्रीटीकरण होणार आहे.
शनिवारी प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे. चारचाकी व दुचाकी वाहनचालकांसाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जागेतून तात्पुरता पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. रस्ता पूर्ण होईपर्यंत पर्यायी रस्त्याचा वापर वाहनचालकांनी करावा. अनेक दिवसांपासून दुरवस्था झालेल्या या रस्त्याचे काम सुरु झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
वाघोली-आव्हाळवाडी रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली होती. परिसरातील सोसायटीधारक, आव्हाळवाडी ग्रामस्थ, नागरिक, विशेषतः महिला वर्गाकडून रस्ता दुरुस्तीच्या मागण्या होत होत्या. रस्ता कॉंक्रीटीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
– संदीप सातव, ग्रामपंचायत सदस्य वाघोली.