सोयाबीनच्या मळणीत पावसाचा व्यत्यय

सातारा  – जिल्ह्यात सर्वत्रच परतीचा पाऊस रेंगाळल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र पावसाची अल्प विश्रांती मिळताच अनेकठिकाणी शेतात उभे असलेले सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांनी काढून सुरक्षित ठिकाणी ढिग करुन ठेवले आहे. तसेच पावसाची उघडीप मिळताच हे सोयाबीन मळण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र त्यातही मळणी सुरु असतानाच पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांची मात्र चांगलीच धांदल उडत आहे.

यावर्षी जिल्ह्यात पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. मान्सून पावसानेही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र पावसामुळेही फारसा फरक न पडणारे सोयाबीन मान्सूनच्या तडाख्यात वाचले खरे. परंतु परतीच्या पावसाने ऐन काढणीच्यावेळेस जोर धरल्याने सोयाबीनचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यातूनही काही शेतकऱ्यांनी पावसाची विश्रांती मिळताच मजुरांना वाढीव मजुरी देऊन शेतातील सोयाबीन काढून कसेबसे बाहेर काढले आहे. मात्र आता ते मळत असतानाच अनेकदा पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांची मात्र मोठी अडचण झाली आहे.

ऐन मळणी सुरु असतानाच आलेल्या पावसामुळे हे सोयाबीन भिजत असल्याने त्याला व्यापारीदेखील कवडीमोल दराने घेत आहे. तीन ते चार हजार रुपये दर असताना केवळ भिजल्यामुळे आणि नीट वाळले नसल्याने एक ते दीड हजार रुपये क्विंटलने व्यापारी शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.