शहरात पसरले धुळीचे साम्राज्य!

नगर – शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. शहरात काही ठिकाणी खोदकाम केलेले आहे, त्यामुळे शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य दिसून येते. पी. डब्लू. डी. खाते आणि मनपा प्रशासनयामध्ये कुठलाही समन्वय असल्याचे दिसत नाही. शहरात जे धुळीचं चित्र दिसून येते, याला पूर्णतः मनपा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम खाते जबाबदार असल्याचे बोलल्या जाते. हे दोन्ही विभाग आपापली जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्याची कुजबूज नागरिकामध्ये आहे.

शहरातील लाल टाकी ते दिल्ली गेट या रस्त्याची पूर्ण दुर्दशा झाली असून, त्याच्या दुरुस्तीकडे मनपा प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले. या रस्त्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी निकालात काढण्यापेक्षा फक्त मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टीच आजवर केल्या गेली. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. खड्डे बुजवण्यासाठी केवळ मुरूम वापरल्या गेला.

आता या खड्ड्यांतील मुरूम देखील पावसाळ्यात वाहून गेला. त्यामुळे रस्त्यावरच्या धुळीने स्थानिक व्यावसायिक त्रस्त आहेत. शिवाय आता या रस्त्याच्या बाजूला खोदकाम काम चालू आहे. या रस्त्यावर न्यू आर्ट कॉलेज, चहावाले, छोटे-मोठे व्यावसायिक आहेत. या धुळीचा या लोकांसोबतच रस्त्यावरील प्रवासी, विद्यार्थी यांना धूळ आणि वाहनांच्या धुराचा सामना करावा लागत आहे. आधीच खड्डे चुकवत वाट शोधावी लागत असतांना धुळीचे कण डोळ्यात गेल्यामुळे वाहने चालवतांना प्रवाशांना अडचणी येत आहेत.

प्रवासी धुळीचा आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून मास्कचा वापर करतात. व्यावसायिक नाकाला रुमाल वापरतात. दिल्ली गेट रस्त्या सोबतच शहरातील इतर रस्त्यावर देखील धूळ वादळी आहे. त्यात नेप्ती, माळीवाडा, सर्जेपुरा या भागातही धुळीचे साम्राज्य दिसून येते.

धुळीचा रस्त्यावर तर त्रास होतोच, शिवाय स्थानिक दुकानदारांच्या दुकानात देखील धूळ साचल्याने, दुकानदार लोक बेजार झाले आहेत. या धुळीचा
परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. येथील काही व्यावसायिकांचे धुळीमुळे डोळे आले आहेत. धुळीचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून मनपा प्रशासनाने तातडीने रस्त्यांचे मार्गी लावले पाहिजे.

 

धुळीमुळे श्‍वसनाचे आजार वाढतात. ज्यांना धुळीची ऍलर्जी आहे, त्यांना धूळ सहन होत नाही. त्यांच्यावर धुळीचा परिणाम लवकर होतो. श्‍वसनाचे आजार असलेल्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. ऍलर्जी, दम्याचा त्रास असलेल्या नागरिकांनी शक्‍यतो, बाहेर पडू नये. पडलेच तर नाकाला मास्क किंवा रुमाल वापरावा.
डॉ. गाडे
प्रभारी, जिल्हा शल्य चिकित्सक

रस्त्यावरील धुळीचा इतका त्रास वाढला की, दुकानामध्ये बसणे देखील कठीण झाले. धुळीचा श्‍वसनाला त्रास होत आहे. नाकावाटे, तोंडाद्वारे धूळ शरीरात जाते आहे. याचा परिणाम आरोग्यावर आम्हाला जाणवतो. धुळीचा नाक आणि घशाला त्रास होतो. मनपाच्या कारभारामुळे रस्ते दुरुस्त केले जात नाही, त्यामुळे धूळ वाढली.

संतोष केदारी स्थानिक फोटो व्यावसायिक

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.