नवी दिल्ली – रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची आंतरराष्ट्रीय ज्युडो महासंघाने अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याचे पडसाद आता जागतिक क्रीडाक्षेत्रावरही पडू लागल्याचे दिसत असून अनेक देशांतील खेळाडूंनीही रशियाने केलेल्या हल्ल्यांचा निषेध केला आहे.
केवळ पुतिन यांनाच हा फटका बसला नसून त्यांच्या फुटबॉल संघावरही नामुष्की ओढावली आहे. पोलंड आणि स्वीडन या दोन संघांनी आगामी फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेतील रशियाविरूद्धचे पात्रता सामने खेळण्यास नकार दिला आहे.
पोलंडचा कर्णधार रॉबर्ट लेवानोव्हस्की या स्टार खेळाडूनेही देशाच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. मॅंचेस्टर युनायटेड या इंग्लंडमधील बलाढ्य फुटबॉल क्लबनेही रशियाची विमान कंपनी एअरोफ्लोटचे प्रायोजकत्व नाकारले आहे. इतकेच नव्हे तर जर्मनीमधील शाल्के 04 या प्रसिद्ध फुटबॉल क्लबने रशियाचा लोगो आपल्या संघाच्या टी-शर्टवरून हटवला आहे.