नवी दिल्ली– टाटा मोटर्सची टाटा सुमो ही गाडी फार यशस्वी आणि लोकप्रीय झाली होती. मात्र याचे सुमो हे नाव काहीसे वेगळे आहे. त्यावरून बऱ्याच चर्चाही झाल्या आहेत. कदाचित गाडीच्या मोठ्या आकारामुळे हे नाव ठेवले असावे अशीही चर्चा होती. मात्र त्यामागची एक रंजक माहिती काही संकेतस्थळांवर उपलब्ध झाली आहे.
टाटा मोटर्सचे माजी कर्मचारी असलेल्या व्यक्तीच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आल्याचे ही माहिती सांगते. हे कर्मचारी अन्य कोणी नसून टाटा मोटर्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुमंत मूळगावकर आहेत. त्यांच्या नावातील दोन अद्याक्षरांवरून सुमो हे नाव ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
1994 मध्ये दहा आसनी कारच्या स्वरूपात टाटा सुमो लॉंच करण्यात आली होती. मोठी गाडी असण्याची हौस असणाऱ्यांकडून या कारला जोरदार पसंती मिळाली व 1997 पर्यंत तब्बल 1 लाखापेक्षा जास्त कार विकल्या गेल्या होत्या. टाटाच्या यशस्वी मॉडेलपैकी एक म्हणून आजही सुमोचे नाव घेतले जाते.
जेआरडी टाटा यांनी 1945 मध्ये टाटा इंजिनिअरींग अँड लोकोमोटिव कंपनी अर्थात टेल्कोची स्थापना केली होती. याच कंपनीला नंतर टाटा मोटर्स या नावाने ओळखले जाउ लागले. 1998 मध्ये या कंपनीने टाटा इंडिका ही देशाची पहिली स्वदेशी कार तयार केली होती.
भारतातल्या सर्वसामान्यांनाही कार वापरता यावी या उद्देशाने रतन टाटा यांच्या प्रेरणेतून 2008 मध्ये टाटाने नॅनो लॉंच केली होती.