मुंबई – रिझर्व बॅंकेच्या पतधोरण विषयक समितीची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे एकूण आर्थिक परिस्थिती आणि करोनाचे वाढत असलेले रुग्ण पाहता सध्याच्या परिस्थितीमध्ये रिझर्व बॅंक व्याजदरात बदल करणार नाही असे बऱ्याच विश्लेषकांना वाटते.
पतधोरण समितीची बैठक पाच एप्रिल रोजी सुरू सुरू होईल आणि सात एप्रिल रोजी पतधोरण जाहीर केले जाईल. किरकोळ आणि घाऊक किमती वरील महागाईचा दर वाढलेला आहे. मात्र विकास दर वाढण्याची तितकीच गरज असल्यामुळे महागाई वाढूनही रिझर्व्ह बॅंक व्याजदरात कपात करणार नाही असे समजले जाते.
मात्र भविष्यातील गरज लक्षात ठेवून व्याजदर कपातीची शक्यता मात्र रिझर्व्ह बॅंक खुली ठेवू शकते. अनारॉक प्रोपर्टीचे अनुज पुरी यांनी सांगितले की, रिझर्व बॅंकेने फेब्रुवारी 2020 पासून रेपो दरात 1.15 टक्क्याची कपात केली आहे. सध्याची परिस्थिती जरी अस्थिर असली तरी रिझर्व बॅंकेला या पतधोरणाचा वेळी व्याजदर आहे त्या पातळीवर ठेवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. रिझर्व्ह बॅंक याच पर्यायाचा वापर करण्याची शक्यता आहे.
भारतासारखीच परिस्थिती अमेरिकेत आहे. अमेरिकेतील कर्जरोख्याचे परतावे वाढत आहेत. महागाई वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरीही अमेरिकेच्या रिझर्व बॅंकेने चालू आर्थिक वर्षामध्ये व्याजदरात वाढ करणार नसल्याचे सूचित केले आहे. त्यापासून इतर देशांच्या रिझर्व बॅंकाही धडा घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पहिल्या दोन तिमाहीत भारताचा विकास दर उणे पातळीवर गेला आहे. तिसऱ्या तिमाहीत तो अल्प प्रमाणात सकारात्मक पातळीवर आला आहे. हा विकासदर जास्तीत जास्त वेगाने वाढावा याकरिता केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक प्रयत्न करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पतधोरण ठरविले जाईल.