पुणे – मेट्रो प्रकल्पासाठी सुरू असलेल्या खोदकामात “हॅन्ड ग्रेनेड’ सापडले. ही घटना मंगळवारी सकाळी बाणेर येथील “आयसर’ कंपनीच्या गेटसमोर घडली. माहिती मिळताच घटनास्थळी
चतुःशृंगी पोलीस दाखल झाले होते.
काही वेळानंतर लष्कराच्या अधिकाऱ्यांना “हॅन्ड ग्रेनेड’संदर्भात माहिती देण्यात आली. ते देखील तातडीने येथे दाखल झाले. तोपर्यंत परिसरातील खोदकाम थांबवण्यात आले होते. हे ग्रेनेड जिवंत वा मृत आहेत, याची तपासणी करण्यात येणार आहे. तर, परिसरात आणखी काही सापडते का, याचाही शोध घेतला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, “हॅन्ड ग्रेनेड’ सापडल्याच्या घटनेमुळे कामगारांत काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.