नगर -करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये कार्यरत असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना आता 50 लाखांचे विमा सुरक्षा कवच योजना लागू करण्याचा निर्णय पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महापालिका कामागर युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली.
करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कामगार, वैद्यकीय कर्मचारी, कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा संरक्षण देणारी सुरक्षा कवच योजना लागू करण्याची मागणी कामगार संघटनेच्यावतीने करण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी महापालिकेत महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या दालनात बैठक झाली.
या बैठकीला आयुक्त श्रीकांत मायकलवार, उपायुक्त प्रदीप पठारे, अनंत लोखंडे व सरचिटणीस आनंदराव वायकर उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचा 28 मार्च तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून काढण्यात आलेल्या 11 एप्रिलच्या परिपत्रकानुसार महापालिका युनियनने केलेल्या मागणीप्रमाणे करोना प्रतिबंध मोहिमेत काम करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.