सोमाटणे – भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकासासाठी आराखडा सादर करा, अशी सूचना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिल्या.
यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, आमदार दिलीप मोहिते पाटील, सुनील शेळके, अतुल बेनके, दूरदृष्य प्रणलीद्वारे आमदार उमा खापरे, दत्तात्रय भरणे, अशोक पवार, राहुल कुल, सिद्धार्थ शिरोळे, अश्विनी जगताप आदी उपस्थित होते.
पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक झाली. जिल्ह्यातील तीर्थस्थळ विकास आणि पर्यटन विकासाच्या कामांना गती देण्याच्या सूचना यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिल्या. ते म्हणाले की, उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूर, देहू, आळंदी, भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकास करण्याचा प्रयत्न आहे. या कामांसाठी राज्यस्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकासासाठी प्रस्ताव त्वरीत सादर करावा. तसेच गड किल्ले संवर्धनसाठी ३ टक्के निधी राखीव ठेवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
ग्रामीण भागातील पथदिवे विद्युत देयकाच्या समस्येमुळे बंद राहू नये यादृष्टीने सौर वीजनिर्मितीकडे लक्ष द्यावे. जिल्हा परिषद शाळांमधील हुशार विद्यार्थ्यांची निवड करून नासा आणि इस्रोला पाठविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात येईल. विद्यार्थी निवडीसाठी कटाक्षाने केवळ गुणवत्ता हाच निकष ठेवावा, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री पवार दिल्या.
लोणावळा नगरपरिषदेचे केले अभिनंदन
देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षणात जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ.देशमुख, पुणे महानगरपालिका, लोणावळा आणि सासवड नगरपरिषदेचे अभिनंदन केले.