पिंपरी, दि. 20 (प्रतिनिधी) -राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर गेल्या चार महिन्यांत अनेक महत्वाचे निर्णय घेतले. मनात कोणतीही अडी न ठेवता मी काम करतो. आजपर्यंतच्या प्रवासात जे भेटले त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. जे भेटले नाहीत ते भविष्यात भेटतील. बघतो, करतो, सांगतो असा आपला स्वभाव नाही. जे काम होणार आहे ते तत्काळ मार्गी लावण्यासाठी आपला प्रयत्न असतो. त्यामुळेच बदला घेण्याऐवजी बदल घडविण्याचा जे विचार करतात तेच उंची गाठतात, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार (दि.20) रोजी चिंचवड येथे केले.
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने चिंचवड, थेरगाव येथील कै. शंकरराव गावडे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या 43 व्या राष्ट्रीय अधिवेशनाप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, विश्वस्त एस. एम. जोशी, किरण नाईक आदी उपस्थित होते.
गेल्या अडीच वर्षांपासून मंदावलेल्या राज्याच्या विकासाला चालना देण्याचे काम सुरू केल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सुरुवातीला काही पत्रकार म्हणायचे तुम्ही दोघेच (मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री) आहात, तोपर्यंत निर्णय घ्या. दुसरे आल्यानंतर निर्णय घेताना अडचणी येतील. मग आम्ही निर्णय घेतले की हे दोघेच मंत्रिमंडळ चालवत आहेत, अशा बातम्याही करायचे, अशी मिश्कील टिप्पणी शिंदे यांनी केली. आता राज्यात सर्वसामान्यांचे सरकार आहे. चार महिन्यांच्या सत्ता काळात शेतकऱ्यांना मदत केली, पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले, यासह राज्याच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून पत्रकारिता एक चळवळ आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे. करोनाच्या काळात पत्रकारांनी जीव धोक्यात घालून काम केल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत वाढ
राज्यातील गोर-गरीब नागरिकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत करण्यात येते. मात्र, यापूर्वी ही मदत अवघी 25 हजार रूपये होती. विविध गंभीर शस्त्रक्रियांसाठी ही रक्कम तुटपुंजी होती. यामध्ये वाढ करून 3 लाख रूपये करण्यात आले आहेत. या मदत निधीचा अनेकांला लाभ होत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
अधिवेशनासाठी 25 लाख
राष्ट्रीय साहित्य संमेलनाच्या धर्तीवर पत्रकारांच्या दर दोन वर्षांनी होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाला 25 लाखांची मदत राज्य सरकारने जाहीर करावे, अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनाला 25 लाखांची मदत करण्यात येईल, अशी घोषणा केली.