पुणे – “मी अंजना शिंदे’ हे एका खंबीर स्त्रीचा संघर्षमय जीवनाचा प्रेरणादायी प्रवास असणार एक वाचनीय आत्मचरित्र असल्याच्या भावना 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केल्या. अंजना शिंदे यांचा मुलगा विशाल शिंदे यांनी आईचा जीवन प्रवास मांडणारे हे पुस्तक लिहले असून त्याच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
ज्येष्ठ लेखक प्रा. हरी नरके, ज्येष्ठ लेखक व समीक्षक रविप्रकाश कुलकर्णी, उद्योजक राजेंद्र कोरडे, राजेंद्र धोर्दे, पराग सपकळ, शिरीष पडवळ व ज्ञानेश्वर अभंग हे यावेळी उपस्थित होते.
प्रा. नरके म्हणाले, “ग्रामीण भागातून येऊन फ्लॅट-बंगल्यात धुणीभांडी करणारी एक अल्पशिक्षित महिला कष्टाच्या जोरावर भरारी घेते. प्रामाणिक परिश्रम, लाघवीपणा व हरहुन्नरीपणा यांची झेप किती उंच असते त्याचा आलेख म्हणजे हे आत्मचरित्र आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप फलटणकर यांनी केले, तर श्रीकांत चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.