भोपाळ – मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील एका गावात शनिवारी पहाटे शिकारी व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात तीन पोलिसांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली. राज्याच्या राजधानीपासून सुमारे 160 किमी अंतरावर असलेल्या सागा बरखेडा गावाजवळील शाहरोक रोडवर ही घटना पहाटे 3 च्या सुमारास घडली.
तेथे काही शिकारी आले असल्याची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक तिकडे त्यांना पकडण्यासाठी गेले होते त्यावेळी शिकाऱ्यांनी या पथकावर गोळीबार केला त्यात हे तीन जण ठार झाले. पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तराच्या गोळीबारात एक शिकारीही ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेबाबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली, त्यानंतर त्यांनी प्रत्येक शहीद पोलिसांच्या नातेवाईकांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत तसेच त्यांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली. त्यांनी ग्वाल्हेर झोनचे महानिरीक्षक अनिल शर्मा यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे त्यांच्या बदलीचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.