पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सदर्न स्टार आर्मी वाइव्ज वेल्फेअर असोसिएशनने (आवा) अस्मिता (दक्षिणी कथन) लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या प्रेरणादायी कथाकथन मंचाचे १३ एप्रिल रोजी पुणे येथे राजेंद्र सिंहजी इन्स्टिट्यूटमध्ये आयोजन केले होते. अस्मिता हा आव्हानांवर मात करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांच्या धीरोदत्त पत्नींच्या गाथांमधून प्रेरणा घेण्याचा महत्त्वपूर्ण मंच आहे.
लष्करी अधिकाऱ्याची पत्नी म्हणून जगताना वैयक्तिक आयुष्यातील गुंतागुंत सोडविण्यापासून विविध आव्हानांवर मात करताना या महिला अत्यंत लवचिकता आणि धैर्य दर्शवतात. त्यांच्या कथा प्रेरणा देतात. त्याचबरोबर इतरांना आपल्या जीवनातील अडचणींवर धैर्य आणि दृढनिश्चयाने मात करण्यासाठी प्रोत्साहित करतात.
‘अस्मिता’ (दक्षिण कथन) या नुकत्याच आयोजित कार्यक्रमात दक्षिण भारतातील सैनिकांच्या पत्नींच्या प्रेरणादायी कथा आणि सामाजिक उपक्रमांविषयी ऐकायला मिळाले. यातून या महिलांचे समाजासाठीचे योगदान, लवचिक वृत्ती यांचे दर्शन घडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पर्सिस्टंट फाउंडेशनच्या प्रमुख विश्वस्त सोनाली देशपांडे आणि दे आसरा फाउंडेशन या संस्थेच्या संचालक डॉ. रिया देशपांडे उपस्थित होत्या. कार्यक्रमात शिक्षण,
साहसी उपक्रम, उद्योग, काळजीवाहक, असे विविध प्रकारचे काम करणाऱ्या, कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव ऐकायला मिळाले. आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशनच्या सदर्न स्टारच्या पदसिद्ध प्रादेशिक अध्यक्षा सुबीना अरोरा यांनी आपल्या समारोपीय भाषणात सर्व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व महिलांचे आभार मानले. या कथा केवळ प्रेरणाच देत नाहीत, तर आव्हानांवर मात करण्यासाठी आणि जगात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मानवी आत्म्यात असणाऱ्या अफाट सामर्थ्याचे दर्शन घडवत असल्याचा उल्लेख अरोरा यांनी केला.