तहसीलदारांकडून घारगावातील ओढ्याची पाहणी

भूकंपाचे धक्के बसून खडकाला भेगा : ओढ्याचे पाणी आटल्याने ग्रामस्थ भयभीत
संगमनेर –
संगमनेर तालुक्‍यातील घारगाव व बोरबन शिवहद्दीतील डोंगराच्या कुशीत असलेल्या काळदरा ओढ्यात भूकंपाच्या धक्‍क्‍यांनी खडकाला भेगा पडून ओढ्यातील पाणीही आटले होते. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दुपारी तहसीलदार अमोल निकम यांनी या ठिकाणाला भेट देत ग्रामस्थांना घाबरुन न जाण्याचे आवाहनही केले. या पाहणीचा अहवाल नाशिकच्या मेरी संस्था व नगरच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकाऱ्यांना पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

घारगाव व बोरबन शिवहद्दीत डोंगराच्या कुशीत काळदरा ओढा दरवर्षी पावसाळयात तुडुंब भरुन वाहत असतो. याही वर्षी पाच ते सहा दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी अचानक भूकंपाचे धक्के बसले होते. त्यामुळे काही नागरिकांना या धक्‍क्‍यांचा आवाज जाणवला. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हे धक्के कशामुळे बसत आहेत, हे मात्र समजू शकले नव्हते. माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती कडाळे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, खडकाला मोठ मोठ्या भेगा पडल्या होत्या आणि ओढ्यातील पाणीही आटले होते. ओढ्यात बऱ्याच ठिकाणी भेगाही दिसून येत होत्या. त्यामुळे कडाळे हे घाबरुन गेले होते. त्यानंतर काळदरा ओढ्यात खडकांना भेगा पडल्याची माहिती आजूबाजूच्या लोकांना समजताच त्यांनीही काळदरा ओढ्यात गर्दी केली होती. या घटनेबाबत काही ग्रामस्थांनी तहसीलदार अमोल निकम यांना माहिती दिली.

तहसीलदार निकम यांनी दुपारी काळदरा ओढा याठिकाणी येऊन खडकाला पडलेल्या भेगांची पाहणी केली. निकम म्हणाले, घाबरुन जाण्याचे काही कारण नाही. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही याबाबत माहिती घेतली आहे. संबंधित अहवाल नाशिक येथील मेरी संस्था व नगरच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामस्थांत उपाययोजनांसह जनजागृती व मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)