पुणे (प्रभात वृत्तसेवा) – भारतातील इंग्रजी भाषेच्या प्राध्यापकच्या संघटनेने (एलटाय) पुण्यात शिक्षण घेत असलेल्या अफगाण विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांची आपुलकीने विचारपूस करीत दिलासा दिला.
अफगाणिस्तान आणि भारत या दोन देशांचे प्राचीन काळापासून अत्यंत जिव्हाळ्याचे असे सांस्कृतिक व व्यापारिक संबंध आहेत. अफगाणिस्तानात सध्या जी हृदयद्रावक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर “एलटाय’ या शैक्षणिक संघटनेने पुढाकार घेतला.
भारत सरकार वेगवेगळ्या मार्गांनी रचनात्मक पावले उचलत असतसाना विविध व्यक्ती आणि संघटना आपापल्या पद्धतीने आणि कुवतीनुसार या दोन देशातील जिव्हाळा, आपुलकी, सामंजस्य वृद्धिंगत करत आहेत. ही अत्यंत महत्वाची बाब आहे.
“एलटाय” या संघटनेच्या पुणे शाखेचे पदाधिकारी प्राध्यापक झेड. एन. पाटील, प्रा. अतुल पाटील, प्रा. राहुल काळे, प्रा. स्वप्नील शिरसाठ, प्रा. सचिन गाडेकर व प्रा. किरण पाटील यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.